Tue, Apr 23, 2019 19:32होमपेज › Belgaon › ...तर काका पाटलांची गाठ आ. जोल्‍लेंशी!

...तर काका पाटलांची गाठ आ. जोल्‍लेंशी!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

येत्या 12 मे रोजी होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी निपाणी मतदासंघासाठी भाजपच्या विद्यमान आ. शशिकला जोल्ले यांची उमेदवारी निश्‍चित आहे. सलग पंधरा वर्षे निपाणीचे प्रतिनिधित्व केलेले काँग्रेसचे काका पाटील यांनाच उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. याची औपचारिकताच बाकी असल्याचे बोलले जाते.

काँग्रेस कार्यकर्त्यांचे पाटील यांना पाठबळ आहे. माजी आ. प्रा.सुभाष जोशी यांचेही बळ त्यांनाच असल्याचे बोलले जाते. त्यामुळे पाटील यांच्या उमेदवारीच्या दाव्याला बळकटी आली आहे. काँग्रेस अंतर्गत बंडाळी मोडून निवडून येण्याचे आव्हान पाटील यांच्यासमोर आहे. काँग्रेसचा मोठा प्रभाव निष्प्रभ करून विजयी होण्याचे आव्हान आ. जोल्लेेंसमोर असेल. आ. जोल्ले विरुध्द काका पाटील अशा लढतीची अपेक्षा आहे.

पाटील यांनी सलग 15 वर्षे मतदासंघाचे नेतृत्व केले. मागच्या निवडणुकीत काँग्रेस अंतर्गत बंडाळीने व शेवटच्या आठ दिवसात तब्येत खालावल्याने काका पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले. याचा फायदा भाजपच्या जोल्ले यांना झाला.

काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे उमेदवारी देताना पक्षनेतृत्वाची दमछाक होणार आहे. उमेदवारीवरून नाराज बंडोबांना थंडोबा करण्याचे आव्हान काँग्रेसपुढे असेल. विद्यमान आ. जोल्ले यांचे उमेदवारीचे पारडे सध्या तरी जड आहे. जोल्ले यांनी हळदीकुंकू कार्यक्रमातून गावोगावी संपर्क साधला आहे.  काँग्रेसनेही मतदार मेळावा व  बैठका, गावागावातील बुथ कार्यकर्त्यांची कार्यशाळा घेऊन प्रचार चालविला आहे.

यावेळेला कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवाराची निपाणीच्या राजकारणात एंट्री होण्याचे संकेत आहेत. याचा फटका संभाव्य उमेदवारांनाही बसू शकतो. याचे ‘स्वरूप’ काय असेल हे ऐन निवडणुकीत कळेल. त्यामुळे दोन्हीही गट तितक्याच ताकदीने एकमेकाविरोधात प्रचाराचे रान काही दिवसांपासून उठवित आहेत. मतदारांचाही त्यांना प्रतिसाद मिळत आहे. निपाणीतील लढतीकडे बेळगावसह कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Tags : Kaka Patil, MLA Shashikala Jolle, fight,  Assembly Election, nipani, Constituency,


  •