होमपेज › Belgaon › नाक दाबताच खानापूरच्या कुम्हारी संस्थाधिकार्‍याचे उघडले तोंड...

नाक दाबताच खानापूरच्या कुम्हारी संस्थाधिकार्‍याचे उघडले तोंड...

Published On: Jun 14 2018 1:33AM | Last Updated: Jun 13 2018 11:56PMबेळगाव : प्रतिनिधी

खानापुरातील केंद्रीय ग्राम कुम्हारी संस्थेतील कनिष्ठ कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुंभार यांचे भ्रष्टाचार प्रकरण दै. ‘पुढारी’ने चव्हाट्यावर आणले. याची दखल घेऊन घोटगाळीत 20 जणांकडून घेतलेले पैसे व त्या प्रत्येकाला एक इलेक्ट्रिक व्हीलचे वितरण बुधवारी केंद्रीय ग्राम कुम्हारी संस्थेमार्फत करण्यात आले. तीन लाख 40 हजार किमतीची इलेक्ट्रिक व्हीलचे वाटप झाले. यामुळे लाभधारकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 

खानापुरातील या संस्थेत लाखो रुपयाचा भ्रष्टाचार होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबईहून आलेल्या योगेश शर्मा यांनी सोमवार 11 रोजी घोटगाळी गावात लाभधारकांची थेट चौकशी केली. इलेक्ट्रिक व्हील देण्याची माहिती देऊन परस्पर 20 लाभार्थींकडून प्रत्येकी 2 हजार रु. प्रमाणे 40 हजार रु. जमा करुन तीन महिने उलटले. कुंभार यांनी आपल्याजवळ ती रक्कम ठेवली होती. याची कल्पना प्राचार्य शिरीष तांबे यांनाही नसल्याचे चौकशीत समोर आले. बुधवारी 20 जणांकडून घेतलेले पैसे कुंभार यांनी परत केले आहेत. याची पोचपावती न दिल्याने व व्हील वाटपावरुन कुंभार समाजामध्ये घोटगाळीत दोन गट पडले. यावरुन वाद उफाळून आल्याने भ्रष्टाचार प्रकरण उघडकीस आले. 20 लाभधारकांची स्टायपेंड रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यासंबंधी आदेश प्राचार्यानी दिले आहेत. 

खानापूर तालुका वगळून इतर ठिकाणी  केंद्र सरकारच्या योजना मान्यताप्राप्त संस्था, संघटनामार्फत राबविल्या जात आहेत. मुंबई येथील खादी ग्राम आयोगाकडे तक्रार केल्यानंतर चौकशीचा प्रारंभ झाला. व्यंकटेश कुंभार यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे.  तांबे यांनी त्याना मेमो दिला आहे. मात्र या प्रकरणात केवळ कुंभार यांचा समावेश नसून अणखी तिघे  असल्याचे बोलले जाते. यापूर्वी या संस्थेत सेवा बजावत असलेले माजी प्राचार्य रामरतन प्रजापतीनीही  कामात बेजबाबदारप्रकरणी कुंभार यांना मेमो दिला होता. तो त्यांनी एक महिना स्वीकारला नसल्याची माहिती समोर आली.

बेळगावातदेखील मागासवर्गीयांसाठी अशा प्रकारची योजना राबवून लाखो रुपयाचा मलिदा परस्पर  लाटल्याची माहिती समोर आली आहे.  चौकशीचा ससेमिरा मागे लागल्यामुळे कुंभार   यांनी बुधवारी घोटगाळीतील लाभार्थींकडून घेतलेली रक्कम परत केली. संस्थेतील भ्रष्टाचाराची माहिती आरटीआय अंतर्गत मागविण्याचा निर्णय खानापूर तालुका कुंभार समाजाने घेतला असल्याचे समजते.