Sat, Apr 20, 2019 15:51होमपेज › Belgaon › जप्‍ती येताच जागे झाले ‘प्रांत’

जप्‍ती येताच जागे झाले ‘प्रांत’

Published On: Jan 25 2018 1:02AM | Last Updated: Jan 24 2018 11:39PMबेळगाव ः प्रतिनिधी  

सांबरा विमानतळ विस्तारासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीची भरपाई देण्यास टाळाटाळ करणार्‍या प्रांताधिकारी कार्यालयावर बुधवारी न्यायालयीन जप्ती आणली. परिणामी झोपेतून जागे झालेल्या प्रांत कार्यालयाने  5 दिवसांत भरपाईचे धनादेश देण्याची लेखी ग्वाही दिली.

सांबरा विमानतळाच्या विस्तारिकरणासाठी 2005 पासून 108 शेतकर्‍यांची 100 एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. जमिनीच्या बदल्यात 43 कोटी  नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश न्यायालयाने सरकारला बजावला असून सरकारकडून 14  कोटी 80 लाख प्रांताधिकार्‍यांच्या खात्यावर जमाही झाली आहे.

शेतकर्‍यांमध्ये संताप... 

जमा झालेल्या रकमेचे वितरण शेतकर्‍यांना झालेले नाही. त्यामुळे संतापलेल्या शेतकर्‍यांनी पुन्हा  न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यावर न्यायालयाने प्रांत कार्यालायवर जप्ती आदेश बजवाला. त्यानुसार शेतकर्‍यांचे वकील अ‍ॅड. व्ही. एस. धडेद न्यायालयीन बेलिफला घेऊन बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयावर जप्ती बजावण्यास गेले.

प्रांताधिकारी डॉ. कविता योगपण्णावर अनुपस्थितीत होत्या. त्यामुळे सहाय्यक तहसिलदार कुलकर्णी यांनी शेतकर्‍यांना 29 जानेवारीपर्यंत नुकसान भरपाई देण्याची लेखी हमी देऊन जप्ती टाळली. तांत्रिक कारणामुळे भूसंपादनाची नुकसान भरपाई ट्रेझरीमध्ये अडकली आहे. हा अडथळा त्वरित दूर करून शेतकर्‍यांच्या नावावर पैसे जमा करण्यात येतील, असे कुलकर्णी यांनी सांगितले. भुजंग जोई, भागाण्णा सनदी, किरण जोई, भैरु जत्राटी, मारुती जत्राटी यांच्यासह सांबरा येथील शेतकरी उपस्थित होते.