बेळगाव : प्रतिनिधी
दुचाकी सोडवून घेण्यासाठी न्यायालयात आलेल्या एका संशयिताने शनिवारी भर न्यायालयातच चक्क न्यायाधीशांवरच हल्ला केला. तसेच त्याने काही वकिलांनाही मारहाण केली. खळबळ उडवून देणर्या या प्रकारानंतर हल्लेखोराला अटक केली आहे. संगमेश सदानंद हत्ती (वय 34, रा. लक्ष्मीकृपा, जाधवनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
संगमेशने काही दिवसांपूर्वीच बेळगाव उत्तर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक अलोककुमार यांच्या निवासस्थानी घुसून गोंधळ घातला होता. तसेच अलोककुमारना शिवीगाळ केली होती. यावरून अलोककुमार यांनी एपीएमसी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यावरून एपीएमसी पोलिसांनी संगमेश हत्तीला अटक केली होती. या प्रकरणात त्याने जामीन मिळविला होता.
संगमेश जामीन मिळवून पोलिसांनी जप्त केलेली दुचाकी सोडवून घेण्यासाठी न्यायालयात आला होता, पण सुनावणी सुरू असतानाच त्याने न्यायाधीशांवर हल्ला केल्याची घटना घडली. अचानक तो न्यायाधीशांच्या आसनासमोरील कठड्यावर चढला आणि त्याने न्यायाधीशांना धक्काबुक्की केली. तसेच न्यायालयातील वकिलांनाही मारहाण केली. याबरोबरच तेथील काही वस्तूंचीही मोडतोड केली आहे. त्याला लागलीच मार्केट पोलिसांनी अटक केली. मार्केट पोलिस स्थानकात त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्याची रात्री उशिरा जिल्हा इस्पितळात वैद्यकीय तपासणी करण्यात आली.