होमपेज › Belgaon › जारकीहोळींना नगरप्रशासन, आर.व्ही. यांना महसूल खाते

जारकीहोळींना नगरप्रशासन, आर.व्ही. यांना महसूल खाते

Published On: Jun 09 2018 1:33AM | Last Updated: Jun 09 2018 12:24AMबंगळूर : प्रतिनिधी

बेळगाव जिल्ह्यातून मंत्रिपद मिळालेले एकमेव आमदार रमेश जारकीहोळी यांना नगरप्रशासन आणि क्रीडा खाते मिळणार आहे. तर ज्येष्ठ नेते आर. व्ही. देशपांडे यांना महसूल खाते दिले जाणार आहे. मंत्र्यांचे खातेवाटप निश्‍चित झाले असून, मंजुरीसाठी ते राज्यपालांकडे पाठविण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्रीएच. डी. कुमारस्वामी यांनी दिली.

खातेवाटपाची घोषणा शुक्रवारी उशिरा रात्री किंवा शनिवारी 9 रोजी होऊ शकते. मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन तब्बल 48 तास उलटल्यानंतर खातेवाटप निश्‍चित झाले आहे. खातेवाटपाची लिफाफाबंद यादी राज्यपाल वजुभाई वाला यांच्याकडे पाठविण्यात आली आहे. राज्यपाल अहमदाबादला गेले असून शुक्रवारी रात्री ते परतल्यानंतर निर्णय जाहीर करतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
निश्‍चित झालेल्या यादीनुसार मुख्यमंत्र्यांकडे अर्थ, ऊर्जा, गुप्‍तचर विभाग, माहिती आणि प्रसारण ही खाती राहतील. तर उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्‍वर यांना गृह आणि बंगळूर नगरविकास खाते देण्यात येणार आहे.

काँग्रेस- निजद युती घडविण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारे डी. के. शिवकुमार यांना पाटबबंधारे आणि वैद्यकीय शिक्षण ही खाती देण्यात येतील. तर ज्येष्ठ नेते मल्‍लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांना समाज कल्याण मंत्रालय मिळणार आहे. कुमारस्वामींचे बंधू एच. डी. रेवण्णा यांना सार्वजनिक बांधकाम खाते मिळेल.

गटबाजी नाही : खर्गे

काही ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नसल्यामुळे नाराजी असली तरी गटबाजी नाही, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्‍लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. काही लोक प्रसिद्धीसाठी असे वक्‍तव्य करीत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. गुलबर्गा येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळालेले आमदार नाराज होणे स्वाभाविक आहे. मात्र, कर्नाटक काँग्रेस संघटित आहे आणि संघटित राहील.