Sat, Jul 20, 2019 21:39होमपेज › Belgaon › टस्कराला रोखणार कोण

टस्कराला रोखणार कोण

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

जांबोटी : वार्ताहर

जांबोटी-बैलूर भागात भात मळणी अंतिम असताना अवकाळी पाऊस आणि टस्कर हत्तीच्या वाढत्या मुक्कामामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. ओलमणी-जांबोटी परिसरात हत्तीने ठाण मांडले असून जांबोटीतील शंकर इंगळे यांच्या मळणी करून ठेवलेल्या 15 पोत्यांचे नुकसान केले. यामुळे शेतकर्‍याला पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे. जि. पं. सदस्य जयराम देसाई यांनी पाहणी करून भरपाई मिळवून द्यावी. हत्तीचा बंदोबस्त न केल्यास वन खाते कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. परिणामी महिन्यापासून या भागात ठाण मांडलेल्या टस्कराला रोखणार कोण, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दुसरीकडे वनखाते हतबल बनले आहे.  

 शंकर इंगळे यांनी ओलमणी विजयनगरमधील शिवारात मळणी करून भाताच्या पंधरा पोत्यांचे हत्तीने दिवसाढवळ्या नुकसान केले आहे. शेतकर्‍याच्या समोरच नुकसान करत असताना अनेकप्रकारे प्रतिकार करण्यात आला. मात्र, हत्तीला कोणतेच भय नसल्याचे दिसत आहे.गेल्या महिन्यापासून कुसमळी-ओलमणी व्हाया उचवडे असा मुक्त संचार करणार्‍या हत्तीने धुमाकूळ घातला आहे. त्याच्याकडून आता मळणीचे नुकसान होत आहे.

हत्तीच्या वाढत्या मुक्कामामुळे  ऊसपीकही धोक्यात आले आहे. जांबोटी भागासह तालुक्यात सर्वत्र उसाची तोडणी जोरात सुरू आहे. यंदा पीक चांगले असून उताराही चांगला येत आहे. कारखान्यांकडून दरवर्षी जंगलाजवळील उसाची उचल पहिल्यांदा करण्यात येत होती. यंदा मात्र  याबाबत कोणतीच कार्यवाही होताना दिसत नाही. यामुळे उत्पादक चिंतेत आहे. वनखात्याकडून कोणत्याच उपायोजना हाती घेण्यात आल्या नाहीत.