Fri, Jul 19, 2019 07:08होमपेज › Belgaon › अवकाळीमुळे वीजसेवेचे तीनतेरा

अवकाळीमुळे वीजसेवेचे तीनतेरा

Published On: May 18 2018 1:15AM | Last Updated: May 17 2018 11:31PMजांबोटी : वार्ताहर

गेल्या गुरुवारपासून जांबोटी परिसरात सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे सर्वत्र वाताहत झाली आहे. पावसाबरोबर आलेल्या वादळ, विजांच्या कडकडामुळे भागातील वीजसेवेचे तीनतेरा वाजले असून ठिकठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. अवकाळीचे वातावरण कायम असल्याने मिरची पिकाला फटका बसला आहे.

  जांबोटी आणि परिसरात सलग सात दिवस सायंकाळी पाचनंतर अवकाळी पावसाची हजेरी लागत आहे. पावसाबरोबर येणार्‍या वादळ, विजांमुळे वीजसेवा खंडित होत आहे. पाच ट्रान्स्फॉर्मर, अनेक खांब मोडून पडले तर तारा तुटून नुकसान झाले आहे. यामुळे गेल्या आठवड्यापासून जांबोटीहून पुढची अनेक गावे अंधारात आहेत. हेस्कॉमकडून दुरुस्ती सुरु आहे, पण पावासाचे सत्र कायम आहे. यामुळे नुकसानीत भरच पडत आहे.    वादळामुळे जंगलासह रस्त्यावरील झाडे, केळी, शेतातील झोपड्या पडल्या आहेत. बुधवारी सायंकाळी पडलेल्या वादळी पावसाने चोर्ला मार्गावरील जांबोटीजवळ झाड उन्मळून पडल्याने काही काळ एकेरी वाहतूक झाली. परिणामी विजेच्या कडकडाटाने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. संपर्क सेवाही विस्कळीत झाली होती.  
बुधवारच्या पावसाने अनेक गावांत गटारी तुंबल्याने घरामध्ये पाणी शिरले. पावसाचा ऊस पिकाला दिलासा मिळाला तर मिरचीला फटका बसला आहे. 

अवकाळीने मशागतीला वेग

  गेल्या महिन्यापासून अनेकवेळा पडलेल्या अवकाळी पावसामुळे जमिनीमध्ये ओल आल्याने मशागतीच्या कामांना वेग आला आहे. खानापूर ताालुक्यात नंदगड, गोलीहळळ्ी, बेकवाड परिसरात पेरणी सुरु असून जांबोटी भागात भात, रताळी आदी पिकांसाठी नांगरट आणि मशागतीच्या कामांना सुरवात केल्याचे चित्र आहे. यंदा अवकाळीने जोर धरला आहे. यामुळे गेले दोन महिने असलेली पाणीटंचाई तूर्तास कमी झाली आहे. आतापर्यंत अनेकवेळा पडलेल्या पावसामुळे नदी, नाल्यांमध्ये पाणी झाले आहे. जांबोटीसह भागात रताळी, भात पेरणीसह विविध पिकांच्या मशागतीचे काम शेतकर्‍यांनी हाती घेतले आहे. तसेच साखर कारखाना, खत, घरगुती शेणखत शेतात टाकण्याचे काम उरकून घेण्यात आले आहे. माळरानावरील झुडपे स्वच्छ करणे, भातजमिनीत बांध लागण्याच्या कामाला गती आली आहे. विशेष म्हणजे नांगरटीचे काम आगाऊ पूर्ण केल्यास पेरणी, लावणीच्या कामे होतील. हा हंगाम साधण्यात भागातील शेतकरी गुंतला आहे.