Thu, Apr 25, 2019 18:55होमपेज › Belgaon › बाहुबलींना १००८ कलशांचा जलाभिषेक

बाहुबलींना १००८ कलशांचा जलाभिषेक

Published On: Feb 19 2018 1:24AM | Last Updated: Feb 18 2018 11:37PMबंगळूर : प्रतिनिधी

21 व्या शतकातील दुसरा ऐतिहासिक महामस्तकाभिषेक सोहळा दुसर्‍या दिवशी अपूर्व उत्साहात पार पडला. जैन मुनींच्या उपस्थितीत सकाळी 8 पासून धार्मिक विधींना सुरुवात झाली. 1008 कलशांतून भगवान बाहुबली यांच्या मूर्तीला जलाभिषेक घालण्यात आला. . दुपारी दूध, चंदन, हळद, अष्टगंधसह 21 पदार्थांचे मिश्रण असणारा अभिषेक घालण्यात आला. 

सकाळपासून भाविकांनी कलश खरेदी करण्यासाठी आणि दर्शनासाठी विंध्यगिरी पर्वताच्या पायथ्याशी गर्दी केली होती. दुपारी 2 नंतर भाविकांना विंध्यगिरी पर्वतावर दर्शनासाठी सोडण्यात आले. परंतु, याठिकाणी भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या. उन्हाचे तडाखे सहन करत, बाहुबली यांची भजने गात, जयजयकार करत भाविक पर्वतावर मार्गक्रमण करत होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी महामस्तकाभिषेक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यामुळे कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 4 हजार पोलिस तैनात केले आहेत.  श्रवणबेळगोेळ मठाचे चारुकीर्ती भट्टारक यांच्या नेतृत्वाखाली धार्मिक विधी होणार आहेत.

महामस्तकाभिषेकासाठी 504 पाण्याची घागरी, 350 लि. दूध, 300 लि. उसाचा रस, 350 लि. नारळाचे पाणी, 20 किलो चंदन पावडर, 2 कि. केसर,  20 कि. अष्टगंध, 5 कि. कषाय पावडर, 100 कि. कल्कचुर्ण(तांदळाचे पीठ) याचा दररोज वापर करण्यात येत आहे.दुसर्‍या दिवशी बाहुबलीच्या मूर्तीची पाद्यपुजा स्वामींच्याहस्ते करण्यात आली. त्यानंतर महामस्तकाभिषेक घालण्यात आला.

आज पंतप्रधानांची उपस्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सहभागी होणार आहेत. दु. 1.25 मि. आगमन, 1.30 वा चामुंडराय मंटपमध्ये कार्यक्रम होणार आहे. यावेळी राज्यपाल वजुभाई वाला, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, चारुकीर्ती भट्टारक स्वामी उपस्थित राहणार आहेत. 

अभिषेकामुळे होतो लाभ, भाविकांची श्रद्धा

नारळ पाण्याच्या अभिषेकामुळे पित्त, कफनाश, उसाच्या रसापासून कामदोष दूर होतो, तर, दुधामुळे जीवन मधुर होते. कशायाभिषेक केल्यास ज्वरनाश, गंधाभिषेकाने जीवन सुगंधी होते, असा भाविकांची श्रद्धा आहे.