Sun, May 26, 2019 01:05होमपेज › Belgaon › ‘डबल हॅट्ट्रिक’साठी जगदीश शेट्टर सज्ज

‘डबल हॅट्ट्रिक’साठी जगदीश शेट्टर सज्ज

Published On: May 11 2018 1:11AM | Last Updated: May 10 2018 9:15PMबेळगाव : प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर हे सलग दुसरी हॅट्रीक साधण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांना रोखण्यासाठी धारवाड मध्यवर्ती मतदारसंघात तब्बल 25 जण रिंगणात उतरले आहेत. यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस, निजद आणि आपच्या उमेदवारांचा समावेश आहे.भाजपने शेट्टर यांना सहाव्यांदा उमेदवारी दिली आहे. राज्याच्या राजकारणात बडी हस्ती म्हणून ओळखल्या जाणार्‍या शेट्टर यांना मतदारसंघातच घेरण्यासाठी अन्य राजकीय पक्षांनी पुरेपूर तयारी चालविली आहे. सलग 25 वर्षे या मतदारसंघाचे ते प्रतिनिधीत्व करत आहेत. अतिशय मृदु स्वभावाचे राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे.भाजपच्या ताब्यात असणारा हा मतदारसंघ खेचून घेण्यासाठी काँग्रेसने प्रयत्नाची पराकष्ठा केली आहे. परंतु, अद्याप त्यांना यश मिळाले नाही. 2013 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार डॉ. महेश नलवाड यांचा 17,754 मतांनी शेट्टर यांनी पराभव केला होता.डॉ. नलवाड यांना पुन्हा एकदा भाजपने उमेदवारी दिली आहे. 

याठिकाणी उमेदवारांची भाऊगर्दी झाली आहे. 18 अपक्ष उमेदवारासह 8 पक्षीय उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये प्रामुख्याने निजदचे राजण्णा कोरवी, आपचे संतोष नरगुंद यांचा समावेश आहे. आपचे संतोष कोरवी हे अभियंते असून त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मध्यमवर्गियांना आकर्षित केले आहे. हा मतदार भाजपचा असून त्याचा फटका भाजपला बसणार आहे.शेट्टर यांची मदार प्रामुख्याने मतदारसंघातील लिंगायत मतावर आहे. लिंगायत समाजाच्या पाठिंब्यावर आजवर त्यांनी निवडणुकीत बाजी मारली आहे. यावेळी त्यांच्या एकगट्टा मतामध्ये घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लिंगायत समाजाने मागील काही दिवसापासून स्वतंत्र लिंगायत धर्मासाठी रान उठविले आहे. त्याला भाजपने विरोध केला आहे. तर काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. यामुळे लिंगायत समाजामध्ये दोन मतप्रवाह तयार झाले असून त्याचा काँग्रेसला कितपत फायदा होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. डॉ. नलवाड यांनी सलग तीन वेळा शेट्टर यांच्याकडून पराभव स्वीकारला आहे. पुन्हा एकदा त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. यामुळे मतदारामध्ये सहानुभूती आहे. शेट्टर मागुल 25 वर्षापासून प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यामुळे मतदारामध्येदेखील काही प्रमाणात नाराजी आहे. याचा फटका शेट्टर यांना बसेल असा अंदाज काँग्रेस व निजदकडून व्यक्त केला जात आहे.शेट्टर यांनी मतदारसंघात अनेक विकासकामे केली आहेत. त्यामुळे सर्व समाजाकडून आपल्याला पाठिंबा मिळत असल्याचा दावा केला आहे.