Sun, Apr 21, 2019 13:47होमपेज › Belgaon › मराठी भाषा दिन विशेष : चिंतेपेक्षा चिंतन करणे आवश्यक

मराठी भाषा दिन विशेष : चिंतेपेक्षा चिंतन करणे आवश्यक

Published On: Feb 27 2018 2:05AM | Last Updated: Feb 26 2018 11:46PMभारतातील 42 भाषा  मृत्यूपंथाला लागल्या आहेत. भाषांचा अभ्यास करणार्‍या संस्थेने तसेच तज्ज्ञांनी ही भीती व्यक्त केली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील ‘निहाली’ आणि कर्नाटकातील एका भाषेचाही समावेश आहे. एका बाजूला ‘मराठी’ला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सगळीकडून जोर लावला जात असतानाच ही बातमी प्रसारित झाली आहे. 

प्रत्येक समाजाची म्हणून वेगळी अशी भाषा असते. ती जपली जावी यासाठी सर्वजण प्रयत्न करत असतात तरीसुद्धा प्रचंड वेगाने माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती घडत आहे. त्यासमोर अनेक भाषांनी मान टाकली आहे.  आज आपण मराठी भाषा दिन साजरा करत आहोत. मराठी भाषेच्या बाबतीतही हा प्रश्‍न वारंवार उपस्थित केला जात आहे. जवळपास 90 वर्षापूर्वी वि. का. राजवाड्यांनी ‘मराठी भाषा ही मुमूर्ष झाली आहे’ असा सवाल उपस्थित केला होता. अलीकडे तर इंग्रजी भाषेचे प्रस्थ वाढत चालले असताना हा प्रश्‍न अधिकच जोरात चर्चेला येत आहे. भालचंद्र नेमाडेंसारख्या विद्वानांनी जोपर्यंत ग्रामीण भागाच्या व्यवहाराची भाषा मराठी आहे, तोपर्यंत तरी या भाषेला धोका नाही, असा निर्वाळा दिला आहे. 

भाषा ही आपल्या संस्कृतीची वाहक असल्यामुळे तिचे जतन होणे आवश्यकच असते. भाषांचे जतन केले नाही आणि त्या लुप्त झाल्या तर  पुढील पिढीला मागच्या इतिहासाचा अभ्यास करताना अनेक अडचणी उभ्या राहतात. आज  मराठी बोलणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात असली तरीही शिक्षणा  व व्यवहारातून इंग्रजीने भारतीय भाषांवर प्रभुत्व गाजवलेले दिसते.आज इंग्रजी बोलणारे, समजणार्‍यांची संख्या आमच्या देशाच्या लोकसंख्येच्या मानाने मूठभरच आहे. तरीही ती आज कार्पोरेट जगताची, राज्यकारभाराची व व्यवहाराची भाषा बनत चालल्याचे चित्र दिसत आहे. बर्‍याच ठिकाणी हिंदी नंतर इंग्रजी ही संपर्काची भाषा बनली आहे. हिंदी ही आपल्या देशात मोठ्या प्रमाणात बोलली जाणारी संपर्क भाषा असली तरी तिला नेहमीच दक्षिण भारतातून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आला आहे. येथे हिंदीला विरोध होण्यामागे त्यांना आपल्या मातृभाषेचा जाज्वल्य असा अभिमान आहे. .जोवर आमची भाषा मग ती कोणतीही असेल ती आमच्या व्यवहाराची, बोलण्याची, लिहिण्याची, कारभाराची भाषा  होत नाही, तोवर ती वाढू शकत नाही.    

आज बहुभाषिक अशी  नवी पिढी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर  व्यक्‍त होते. पण हे व्यक्‍त होण्यासाठी ती  इंग्रजी  माध्यमाचा आधार घेत असलेली दिसते. हे थांबवायचे असेल तर या पिढीसाठी  सोप्या मराठी भाषेतील तंत्रज्ञान,अ‍ॅप्स विकसित करून देणे आवश्यक आहे.  

हिंदी किंवा इंग्रजी या भाषा समृद्ध आहेत. इंग्रजीच्या ऑक्स्फर्ड शब्दकोशात सातत्याने  नवीन शब्दांची भर पडत असते.  याउलट आपण मात्र इंग्रजीसह इतर भाषांच्या अतिक्रमणांवर चर्चा करताना दिसतो. मराठीतील त्या त्या काळातील भाषिक टप्पे, त्यातील सौंदर्यस्थळे, मौखिक वाङ्मय यांचे संचित जपण्याची जबाबदारीही आपलीच आहे. त्यात कसूर होत असल्यानेच मराठी भाषेबद्दलच्या चिंतेला वाव मिळतो. मराठी भाषेच्या चिंतेपेक्षा चिंतन करणे आवश्यक आहे. 

रणजित चौगुले, शिक्षक सरदार्स हायस्कूल