Tue, Mar 19, 2019 03:58होमपेज › Belgaon › अल्पवयीन मुलांना दुचाकी देणे धोक्याचेच

अल्पवयीन मुलांना दुचाकी देणे धोक्याचेच

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 26 2018 12:21AMबेळगाव : प्रतिनिधी

आतापर्यंत झालेल्या अपघातात कोवळ्या मुलांचा जीव गेला आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण होण्याआधीच त्यांच्या हातात दुचाकी दिली जाते. पालकसुध्दा कौतुकाने आपला मुलगा-मुलगी दुचाकी चालवितात हे अभिमानाने सांगतात. मात्र दुचाकी चालविताना अपघातात कोवळे जीव जातात त्याचे काय? यासाठी पालकांनी दुचाकी चालविण्यास मज्जाव करावा असे तज्ञांचे म्हणणे आहे.

दुचाकीची संख्या रस्त्यावर इतकी वाढली आहे की सायकल पाहणे दुर्मिळ होत चालले आहे. दहावी झाली तर मुलगा - मुलगी दुचाकीसाठी हट्ट धरतात. त्याशिवाय आपण कॉलेजलाच जाणार नाही असा हट्ट धरुन बसतात. पालकांनी जरी दुचाकी द्यायची नाही असे ठरविले तरी आजी - आजोबा त्यांचे लाड पुरवितात. बाजाररहाट करण्यापासून कोणतेही काम युवक-  युवतींना सांगावयास गेले तर, दुचाकीशिवाय ते बाहेर पडत नाहीत. मोकळ्या मैदानात दुचाकी चालविणे वेगळे व प्रवासाला जाताना दुचाकी चालविणे यात फरक असतो. हे पालकांनी आपल्या मुलांना समजावून सांगणे गरजेचे आहे. प्रवासाची आवड सर्वांनाच असते त्यासाठी प्रवास जरुर करावा मात्र जीवाची सुरक्षा सर्वात महत्त्वाची हे लक्षात घेतले पाहिजे. 

मुले पालकांना चकविण्यासाठी सिनेमाला जातो, मित्राच्या घरी जातो, जादा क्‍लास आहेत,  अशी कारणे सांगून घरातून बाहेर पडतात. बाहेर फिरावयास लागणारे कफडे देखील अगोदरच नियोजनानुसार पोहचविण्यात मुले तरबेज असतात.दुचाकी सुध्दा तिर्‍हाईताची वापरतात. त्यामुळे अपघात घडल्यानंतर तिर्‍हाईत  देखील अडचणीत येतात.  त्यामुळे मुलांच्या हालचालींवर पालकांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे, असेही तज्ञांचे म्हणणे आहे.