Wed, Nov 14, 2018 04:15होमपेज › Belgaon › कंटेनर टेम्पो अपघात, दोन ठार 

कंटेनर टेम्पो अपघात, दोन ठार 

Published On: Aug 19 2018 1:27AM | Last Updated: Aug 19 2018 12:08AMइस्लामपूर /बेळगाव : 

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरनजीक वाघवाडी फाट्याजवळ थांबलेल्या कंटेनरला टेम्पोने पाठीमागून धडक दिल्याने दोघेजण जागीच ठार झाले.  टेम्पोचालक गंभीर जखमी झाला. हा अपघात शनिवारी पहाटे झाला. कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. अपघातातील मृत बेळगाव जिल्ह्यातील अंकलीखूट आणि खानापूरचे आहेत. 

शहाहुसेन शब्बीर शेख (वय 26, रा. अंकलीखूट, ता. चिकोडी) आणि त्याचा मावसभाऊ सोहेल दस्तगीर मुरगुडे (24, रा. खानापूर, जि. बेळगाव) अशी  मृतांची नावे आहेत.  चालक मोहम्मद सलाउद्दीन सरदार देसाई (39, रा. मेहबूबनगर, ता. चिकोडी) हे जखमी झाले. अपघाताची नोंद इस्लामपूर पोलिस ठाण्यात झाली आहे. देसाई  हे टेम्पो (एम.एच.48/टी-5342) घेऊन   बेळगावकडे चालले होते. टेम्पो मालकाचा मुलगा शहाहुसेन शेख व त्याचा मावसभाऊ सोहेल मुरगुडे हे टेम्पोमध्ये होते. 

 वाघवाडी फाट्याजवळ वारणा कालवे कार्यालयासमोर रस्त्याकडेला एक कंटेनर उभा होता. टेम्पोची पाठीमागून कंटेनरला जोराची धडक बसली. या धडकेत बाजूला  बसलेले शहाहुसेन व सोहेल  जागीच ठार झाले. 

अपघातात टेम्पोच्या केबीनचा पूर्णपणे चक्काचूर झाला. चालक देसाई  केबीनमध्येच जखमी अवस्थेत अडकून पडले होते. काही वेळाने हाय-वे पॅट्रोलिंगचे पोलिस निरीक्षक विकास माने, मधुकर साळुंखे, हर्षद माळी यांनी जखमी व मृतांना बाहेर काढले.