होमपेज › Belgaon › शेती, शेतकर्‍यांसाठी कृषी खात्याकडून विमा योजना

शेती, शेतकर्‍यांसाठी कृषी खात्याकडून विमा योजना

Published On: Jun 15 2018 1:04AM | Last Updated: Jun 14 2018 10:43PMअंकली : प्रतिनिधी

शेती आणि शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी खात्याकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. नैसर्गिक आपत्तीपासून होणार्‍या पिकांच्या नुकसानीला संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे कवच आहेच. त्याचबरोबर शेतकर्‍यांनाही विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे. वैयक्‍तिक अपघात विमा(प्रधानमंत्री सुरक्षा विमा) योजना आणि जीवन विमा (प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा) योजना अशा दोन विमा योजनेंतर्गत शेतकर्‍यांवर विमा उतरवण्यात येत असल्याची माहिती कृषी खात्याने दिली आहे.

कृषीखात्यातर्फे सध्या खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना सवलतीच्या दरात खत, बियाणे, शेती अवजारे, औषधे तसेच इतर कृषीपयोगी साहित्य वितरित केले जात आहे. तालुकानिहाय कृषी केंद्राद्वारे शेतकर्‍यांना या योजनांचा लाभ मिळत आहे. पिकांवर विमा उतरवण्यासाठी लागणारे अर्ज सर्व बँका आणि कृषीपत्तीन संघांमध्ये उपलब्ध आहेत. कृषी खात्याकडून पिकांबरोबरच शेतकर्‍यांनाही विम्याचे संरक्षण देण्यात येत आहे.

वैयक्‍तिक अपघात विमा योजना 18 ते 70 वर्षे वयोगटातील शेतकर्‍यांसाठी लागू असून वार्षिक विम्याचा हप्ता 12 रु. आहे. 1 जूनपासून मे 2019 पर्यंत हा विमा लागू पडतो. कमीत कमी एक लाखापासून जास्तीत जास्त 2 लाखापर्यंत भरपाई मिळते. जीवन विमा योजनेसाठी शेतकर्‍यांचे वय 18 ते 50 वर्षे असणे बंधनकारक आहे. यासाठी वार्षिक हप्ता 330 रुपये असून 1 जूनपासून मे 2019 पर्यंत हा विमा लागू पडतो. यात जास्तीत जास्त 2 लाखांपर्यंत भरपाई मिळते, असेही कृषी खात्याने कळविले आहे.