Mon, Sep 24, 2018 19:25होमपेज › Belgaon › आयजीपींनी घेतली १४७ आरोपींची हजेरी

आयजीपींनी घेतली १४७ आरोपींची हजेरी

Published On: Jan 12 2018 1:51AM | Last Updated: Jan 11 2018 8:00PM

बुकमार्क करा
निपाणी : मधुकर पाटील

उत्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक आलोककुमार यांनी बुधवारी रात्री निपाणी सर्कलअंतर्गत येणार्‍या चार पोलिस स्थानकांच्या रेकॉर्डवरील 147 आरोपींची तब्बल तासभर हजेरी घेतली. त्यांनी स्वत: हातात छडी घेऊन आरोपींचे  मानसिक प्रबोधनही केले. 

यापूर्वीचे अधिकारी डॉ.रामचंद्रराव यांची बदली झाल्याने, त्यांच्या जागी दोन दिवसांपूर्वी आलोककुमार यांची नियुक्ती झाली आहे. मूळचे बिहारी आलोककुमार कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जातात. बेळगावात आल्यानंतर दोनच दिवसात त्यांनी जिल्ह्यातील अनेक स्थानकांना भेटी देण्याचा सपाटा लावला आहे. बुधवारी त्यांचा दौरा निश्‍चित होण्यापूर्वी येथील शहर, बसवेश्‍वर चौक, ग्रामीण, खडकलाट या स्थानकांच्या रेकॉर्डवर असणार्‍या आरोपींची कसून चौकशी करणार असल्याचे आदेश धाडले. त्यानुसार पोलिसांनी त्याची तयारी चालविली. यामध्ये शहर स्थानकातील 82, ग्रामीणमधील 32, बसवेश्‍वर चौक स्थानकातील 25 तर खडकलाट स्थानकातील 7 अशा 147 आरोपींची वैयक्तिक  शहर स्थानकाच्या मैदानावर सखोल चौकशी केली. ती करताना त्यांनी संबंधिताने केलेला गुन्हा, त्याचे गाव, नाव याची विचारणा केली.

आलोककुमार यांनी आरोपीला गुन्हा का केला, सध्या काय करतोस, गुन्हा करताना कुटुंबाचा विचार केला होतास का, जनतेला अथवा एखाद्याला वेठीस धरून गुन्ह्यात का अडकलास, बेकायदा दारू का विकलीस, मटका जुगार का घेतला वा खेळलास  आदी बाबींची चौकशी केली. शिवाय पुन्हा असा गुन्हा करू नकोस, कुटूंबाचा विचार कर असा सल्ला दिला. त्यांनी हातात छडी घेतल्याचा भाव आणि त्यांच्या मनात असणारा राग व माया हे सारे हजेरी देण्यासाठी आलेल्या सर्वांना दिसून आले.

स्वागत उपअधीक्षक दयानंद पवार यांनी केले. सीपीआय किशोर भरणी, ग्रामीणचे फौजदार निंगनगौडा पाटील, खडकलाटचे बसगौडा पाटील, बसवेश्‍वर चौकच्या रोहिणी पाटील, एस. जी. खानापुरे, डी. बी. कोतवाल, एस. आय. बेटगेरी व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.