Sun, May 26, 2019 01:42होमपेज › Belgaon › म्हणे, कर्नाटकात अन्य भाषिकांचा गौरव...

म्हणे, कर्नाटकात अन्य भाषिकांचा गौरव...

Published On: Aug 12 2018 1:01AM | Last Updated: Aug 12 2018 1:01AMबेळगाव/बंगळूर : प्रतिनिधी

सीमाभागातील मराठी भाषिकांवर सातत्याने अन्यायाचा वरवंटा फिरवणार्‍या कर्नाटक सरकारला राज्यातील भाषिक अल्पसंख्याकांचे हित जोपासण्यात येत असल्याचा साक्षात्कार झाला आहे. कन्‍नड विकास प्राधिकरण अध्यक्ष एस. जी. सिद्धरामय्या यांनी राज्यात अन्य भाषिकांचा गौरव करण्यात येत असल्याचे उद‍्गार काढले आहेत. यामुळे आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे.

केरळ राज्यातील कासरगोड जिल्ह्यातील कन्‍नड माध्यमाच्या शाळांमध्ये मल्याळम भाषेचा शिक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कर्नाटक सरकार बिथरले असून, त्यांनी याबाबत केरळ सरकारकडे नाराजी व्यक्‍त केली आहे. 

प्राधिकरणाचे अध्यक्ष सिद्धरामय्या यांनी केरळच्या शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी, संघराज्य व्यवस्थेमध्ये राज्यातील भाषिक अल्पसंख्याकांचे हित जोपासणे आवश्यक असते.कर्नाटक सरकार राज्यातील कन्‍नडेतर भाषिकांचा नेहमीच सन्मान करते. त्यांच्या भावना जपण्याचे काम करत असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे.

केरळ सरकारने कन्‍नड माध्यमाच्या शाळांमध्ये मल्याळम शिक्षक नेमू नये, अशी मागणी केली आहे. वास्तविक, कर्नाटक सरकारकडून सीमाभागातील मराठी शाळांमध्ये कन्‍नड भाषिक शिक्षक नेमून मराठीची गळचेपी करण्याचा प्रयत्न करत आहे. 1986 पासून कन्नडसक्ती होत  आहे. भाषिक अल्पसंख्याक कायद्यानुसार मराठी भाषिकांना कन्नडबरोबर मराठीतून कागदपत्रे देण्यास  नकार देण्यात येत आहे. ही वस्तुस्थितीचा सिद्धरामय्यांना विसर पडल्याचे दिसून येत आहे.

उपमुख्यमंत्र्याची मुक्ताफळे

उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्‍वर यांनी सीमाभागातील मराठी, मल्याळम, तामिळी भाषिकांकडून कन्नड भाषिकांवर अन्याय करण्यात येत असल्याची मुक्ताफळे मंगळूर येथे पत्रकार परिषदेत शुक्रवारी बोलताना उधळली. सीमाभागातील कन्नड भाषिकांचे हित जोपाससाठी आवश्यक पावले उचलण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. तथापि, मराठी भाषिकांनी कन्नड भाषिकांवर काय अन्याय केला हे त्यांना सांगता आलेले नाही.

सिद्धरामय्या उद्या बेळगावात

कन्नड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष एस. जी. सिद्धरामय्या सोमवारी बेळगाव दौर्‍यावर येत आहेत. सीमाभागातील व्यवहारांत किती प्रमाणात कन्नड भाषेचा वापर होतो, याचा आढावा ते घेणार आहेत.

मराठी भाषिकांचा गौरव दूरच, हक्‍कही नाहीत...

कर्नाटकातील कन्‍नडेतर भाषिकांचा कर्नाटक गौरव करते, असे कन्‍नड विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी म्हटले असले, तरी वस्तुस्थिती नेमकी उलटी आहे. कन्‍नडेतर भाषिकांचा गौरव तर दूरच, त्यांचे हक्‍कही त्यांना मिळत नाहीत. सीमाभागातील मराठी लोकांचा हा अनुभव आहे.

भाषिक अल्पसंख्याक म्हणून सीमाभागातील सारी सरकारी कागदपत्रे मराठी भाषेतूनही मिळाली पाहिजेत, असे भाषिक अल्पसंख्याक आयोग म्हणते; पण कर्नाटक त्याची अंमलबजाणी करत नाही.

ज्या भागात मराठी भाषिक 15 टक्क्यांहून जास्त आहेत, त्या भागातील मराठी भाषिकांना मराठीतून कागदपत्रे द्या, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र, त्या निकालाचीही अंमलबजावणी कर्नाटकाने केलेली नाही.

कन्‍नड बोलाल, तर तुमच्यावर उपचार लवकर होतील, असा फलक बेळगाव जिल्हा रुग्णालयात लावण्यात आला होता. म. ए. समितीच्या आंदोलनानंतर तो हटवण्यात आला.