Thu, Jul 18, 2019 08:47होमपेज › Belgaon › अनगोळात ईद-ए-मिलादच्या पूर्वसंध्येला घरकुलाची पायाभरणी 

अनगोळात ईद-ए-मिलादच्या पूर्वसंध्येला घरकुलाची पायाभरणी 

Published On: Jun 16 2018 1:28AM | Last Updated: Jun 15 2018 11:39PMबेळगाव : प्रतिनिधी 

शांतताप्रिय आणि जातीय सलोखा राखणारे शहर, अशी बेळगावची ओळख होती. मात्र हळुहळू शहराची ही ओळख भरकटत चालली असताना अनगोळ, बेळगाव येथे ‘हिंदू-मुस्लिम भाई भाई’ असा नारा देत हिंदू-मुस्लिम धर्मियांच्या एकीतून निर्माण झालेल्या दातृत्वातून निराधार महिलेला हक्काचा निवारा उभारण्याचा संकल्प केला आहे. या कामाचे उदघाटन ईदच्या पूर्वसंध्येला अनगोळात प्रारंभ झाला. 

संपूर्ण कुटुंबात एकटी असणारी आणि कोणताच आधार नसलेली शबाना मीरासाब आंबेडकर ही 35 वर्षीय महिला. गतवर्षी मुसळधार पावसात तिचे मातीचे कौलारू घर उध्वस्त झाले. त्यामुळे तिचे घर बांधून देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

कुरबर गल्लीच्या एका कोपर्‍यात वडीलोपार्जित मातीचे कौलारू घर होते. आई-वडील वार्धक्याने देवाघरी गेले. एक भाऊ अचानक बेपत्ता झाला. अशा स्थितीत शबानावर स्वतःच्या संसाराची जबाबदारी आली. शेजार्‍या-पाजर्‍यांची धुणीभांडी  करून उदरनिर्वाह करीत असताना 2017 च्या मुसळधार पावसात नियतीने रहाते घरच कोसळविले. 

सध्या ती आपल्या बहिणीकडे तात्पुरती रहातेे. घर बांधून देण्यासाठी अश्रफी यंग कमिटीचे अध्यक्ष मुराद पठाण, उपाध्यक्ष सादीक तिगडी, सचिव असीफ मच्छीवाले यांच्यासह मजगाव येथील समाजसेवक वर्धमान गंगाई, संतोष दरेकर, अ‍ॅड. शकुंतला जाधव, सदानंद मेत्री, इरफान पठाण, मुबारक कडलगी, रमेश गोरी, महेश गवळी, सचिन बेडगेर यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. 

संपूर्ण कामासाठी सुमारे 4 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. आश्रफी यंग कमिटीने आतापर्यंत 1 लाख 60 हजार रुपये खर्च केले. तर वर्धमान गंगाई याने 35 हजार रुपयांची मदत केली. स्थानिक रहिवाशी महेश गवंडी, बिलाल शेख हे संपूर्ण गवंडी काम, विजय हे सेंट्रिंगचे काम विनामोबदला करत आहेत. येथील प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीने 500, 1000 रू. अशी मदत या घरकुलासाठी करत आहेत.  स्थानिकांनी आजी-माजी आमदार व अन्य लोकप्रतिनिधीकडे घरकुल बांधून मिळावे म्हणून प्रयत्न केले आहेत.