Sun, Aug 25, 2019 00:05होमपेज › Belgaon › ‘आरटीआय’ अंतर्गत मागविली माहिती

‘आरटीआय’ अंतर्गत मागविली माहिती

Published On: Jul 09 2018 1:01AM | Last Updated: Jul 09 2018 1:01AMबेळगाव : प्रतिनिधी

नियम धाब्यावर बसवून बळ्ळारी नाल्याचा झालेला सर्व्हे, घाईगडबडीत हटविण्यात आलेले अतिक्रमण, बफर झोन पट्ट्यात झालेले पक्क्या स्वरूपाचे बांधकाम यामुळे नाला अतिक्रमण पुन्हा चर्चेचा विषय झाला आहे. आरटीआय अंतर्गत नाल्याची माहिती शेती बचाव समिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू मरवे यांनी मागविली आहे. नाल्यातील अतिक्रमित भिंत हटविल्यानंतरदेखील नाल्यासंदर्भात नव्या वादाला तोंड फुटले आहे. नाल्याच्या बाजूला बफर झोन जागेत कोणत्याही प्रकारचे कायमस्वरुपी बांधकाम करता येत नाही. तरीदेखील बांधकाम झाले आहे. या ठिकाणी बांधकाम करावयास परवानगी मिळाली कशी, असा सवाल  शेतकरी संघटना करीत आहेत.   शासनाने नाल्यातील अतिक्रमण हटविण्याचे केवळ नाटक करुन शेतकर्‍यांच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. बळ्ळारी नाल्यात 20 ते 30 फूट अतिक्रमण झाले असून केवळ 10 फुट अतिक्रमण हटविण्यात आले आहे. नाल्यात 450 फूट लांबीची सरंक्षण भिंत बांधली आहे.  

बफर झोन म्हणजे काय?

एख़ादा नाला किंवा धरण यांच्या नियोजित जागेपासून काही मीटर संपादन केलेली जागा म्हणजे बफर झोन होय. 22 कि. मी. लांबीच्या बळ्ळारी नाल्याच्या दोन्ही बाजूला 50 मीटरपर्यंत जागा संपादन केलेली आहे. ही जागा नाल्याला पूर आला किंवा पाण्याचा निचरा न झाल्याने शिवारात पाणी फुगले तर पाण्याने व्यापते. 

बांधकामाला परवानगी दिलीच कशी?

जागामालक महेंद्र धोंगडी यांनी  सर्व्हे नं. 58/5 या जागेत अतिक्रमण करुन बांधकाम केले कसे? ही जागा बफर झोनच्या पट्ट्यात येत असताना त्यांना बांधकाम करण्यासाठी परवानगी कुणी दिली? घर बांधण्यासाठी महापालिकेत अर्ज केला तर सर्व बाबी तपासण्यात येतात. प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली जाते. त्यानंतर परवानगी देण्यात येते. हे प्रश्‍न अनुत्तरीत आहेत. या भागातील हलगा, जुने बेळगाव, वडगाव, शहापूर व अनगोळ भागातील सुमारे 300 शेतकर्‍यांना रहदारीचा मार्ग बंद झाला आहे. महसूल अधिकार्‍यांनी पाहणी करुन 10 फूट अतिक्रमण झाल्याचे नकाशात दाखवून अहवाल तयार केला. तहसीलदारांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटविण्यात आले.  

पतंप्रधानांकडे पाठपुरावा

उर्वरीत अतिक्रमण हटविण्यासंदर्भात पतंप्रधान, मुख्यमंत्री, भूमापन खाते, माहिती अधिकारी खात्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

नोटिशीविना नाल्याचा सर्व्हे

कोणताही वादग्रस्त सर्व्हे करताना जागा मालकांच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण भागातील शेजारी मालकांला आगाऊ नोटीस द्यावी लागते. त्यानंतर त्यावर आक्षेप मागविण्यात येतात. तारीख व  वेळ ठरवून त्याप्रमाणे सर्वांच्या उपस्थितीत सर्व्हे करावा लागतो. हे नियम धाब्यावर बसवून घाईगडबडीत सर्व्हे करुन अतिक्रमण हटविण्यात आले. याबाबत उलट सुलट चर्चा शेतकरीवर्गात चालू आहे.