Tue, Feb 18, 2020 06:11होमपेज › Belgaon › गौरी लंकेश, कलबुर्गी हत्याप्रकरणी न्यायवैद्यक अहवालातील माहिती

लंकेश, कलबुर्गी प्रकरण : हत्या एकाच पिस्तुलाने

Published On: Jun 09 2018 1:33AM | Last Updated: Jun 09 2018 12:30AMबंगळूर : प्रतिनिधी 

पत्रकार गौरी लंकेश आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची हत्या एकाच पिस्तुलाने करण्यात आली होती, यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळेमध्ये ते सिद्ध झाल्याचे विशेष तपास पथकाने न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात म्हटले आहे. त्याआधारे दोघांचे मारेकरी एकच आहेत, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

गौरी लंकेश यांच्या हत्येचा कट सर्वप्रथम फोंडा-गोव्यात झालेल्या धर्मसभेमध्ये रचण्यात आल्याचेही न्यायालयात दाखल आरोपपत्रात म्हणण्यात आले आहे. गेल्या 30 मे रोजी हे आरोपपत्र तिसर्‍या अतिरिक्‍त न्यायदंडाधिकार्‍यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.

दोन्ही हत्यांसाठी 7.65 मि.मी.ची देशी बनावटीची एकच पिस्तूल वापरण्यात आली होती, असे प्रयोगशाळेत सिद्ध झाले आहे. गौरी हत्या प्रकरणातील मुख्य संशयित के. टी. नवीनकुमारनेही आपल्या जबाबात तेच म्हटले आहे. दोन्ही हत्या करण्यासाठी 7.65 मि.मी.ची देशी बनावटीची एकच पिस्तूल वापरण्यात आली, असा जबाब नवीनकुमारने दिला आहे.

गौरी लंकेश यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. पोलिसांना गौरी लंकेशच्या शरीरातून तीन गोळ्या तर नेम चुकलेली एक गोळी सापडली. घटनास्थळी या चारही गोळ्यांच्या पुंगळ्याही सापडल्या होत्या. तर डॉ. कलबुर्गी यांच्यावर दोन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्या दोन्ही गोळ्या आणि त्यांच्या पुंगळ्याही सापडल्या. 

दोन्ही हत्यांमधील एकूण सहा गोळ्या आणि पुंगळ्या एकत्र केल्यानंतर सहाही गोळ्या एकाच पिस्तूलमधून झाडल्या गेल्याचे सिद्ध झाले. साहित्यिक कलबुर्गी यांची हत्या 30 ऑगस्ट 2015 रोजी धारवाडमध्ये झाली. तर गौरी यांची हत्या 5 सप्टेंबर 2017 रोजी बंगळूरमध्ये झाली. दोघांवरही त्यांच्या निवासस्थानाच्या दारातच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. आरोपपत्रानुसार म्हैसूरचे प्रा. भगवान यांच्या खुनाचा कट रचलेल्यानेच गौरी हत्येमध्ये मुख्य सूत्रधार असल्याचे मान्य केले आहे. 

हिंदू जनजागृती समितीचे मोहनगौड यांच्या आवाहनावरून नवीन हा धर्मसभेमध्ये सहभागी झाला होता. यावेळी नवीन आणि  दुसरा संशयित प्रविण होट्टे यांची राहण्याची व्यवस्था जाणीवपूर्वक एकाच खोलीत करण्यात आली होती.  या सभेमध्ये नवीन याने हिंदूविरोधकांना संपविण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर या हत्या झाल्या. 

गौरीला संपविण्याचा निर्णय ः सभेच्या शेवटच्या दिवशी गौरीला संपविण्यासाठी आपली मुले तयार आहेत, बंदुकीच्या गोळ्या द्या. गेल्यावेळी तुमच्या घरामध्ये देण्यात आलेल्या बंदुकीच्या गोळ्या कामी येणार नाहीत, असे नवीनला सांगण्यात आले. त्याला नवीनाने संमती दिली होती. मलासुद्धा गौरीवर राग असून तिचा खून करण्यात मी सहकार्य केले, असेही नवीनने जबानीत म्हटले आहे.

बेळगावमध्येही भेट

दोन्ही हत्या प्रकरणातील एकूण पाच संशयितांची बेळगावमध्ये भेट झाली होती, असेही विशेष तपास पथकाचे म्हणणे आहे. मूळचा पुण्याचा असलेला  अमोल काळे, अमित देग्वेकर यांच्यासह निहाल उर्फ दादा या  तिघांना नवीन आणि प्रवीण भेटले होते. तेथून ते श्रीरंगपट्टणला गेले. तेथे अनिल नामक युवकाला भेटले. मोबाईल रिपेरीमध्ये चतुर असलेल्या अनिलला तिघेही तुला सर्किट बोर्ड तयार करता येते का, असे विचारतात. ते तिघेही गेल्यानंतर अनिल ‘असे करणे डेंजर आहे. क्रिमीनलसारखे आहे, असे नवीनला सांगतो’, असा तपशील तपास पथकाच्या अहवालात आहे.