Tue, Aug 20, 2019 04:27होमपेज › Belgaon › वडगाव भागात डेंग्युचाही प्रादुर्भाव

वडगाव भागात डेंग्युचाही प्रादुर्भाव

Published On: Jun 13 2018 1:32AM | Last Updated: Jun 12 2018 10:36PMबेळगाव : प्रतिनिधी

वडगाव परिसरातील नागरिक अनेक समस्यांनी त्रस्त झाले आहेत. डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया आदी रोगांच्या तापाची साथ बळावली आहे. यामुळे खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाने घरोघरी जागृती मोहीम हाती घेतली आहे.

या भागात असणार्‍या उपनगरामध्ये मूलभूत सुविधांची वानवा आहे. सांडपाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था नसल्याने रिकाम्या जागेमध्ये सांडपाणी साचून डासांची उत्पत्ती झपाट्याने होत आहे. त्यातून रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे या भागातील नागरिक त्रस्त बनले आहेत.

तापाने त्रस्त असलेले नागरिक सरकारी इस्पितळाऐवजी खासगी दवाखान्यांचा आसरा घेण्याचे पसंत करतात. यामुळे सरकारी आरोग्याधिकार्‍यांना रुग्णांची संख्या मिळणे दुरापास्त बनत आहे. सोमवारी आरोग्याधिकार्‍यांनी बैठक घेऊन घरोघरी जागृती व रुग्णांची माहिती जमविण्याच्या अभियानाला सुरुवात केली आहे.

या भागात उपनगरांची संख्या अधिक आहे. उपनगरामध्ये रस्ते, पाणी, गटारींची सुविधा नाही. यामुळे ठिकठिकाणी सांडपाणी साचत आहे. यातून दुर्गंधी निर्माण होऊन नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. साठलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती झपाट्याने होते. यातून रोगाचा फैलाव होतो.
या भागात असणारे तलावदेखील सांडपाण्यामुळे दूषित बनले आहेत. सांडपाणी थेट तलावात सोडण्यात येते.  दक्षिण भागातील अनेक उपनगरातून येणारे सांडपाणी या परिसरात येते. 
याठिकाणी मनपाने स्वच्छता मोहीम राबविण्याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे पहिल्याच पावसाने ठिकठिकाणी पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा होण्याच्या सुविधेचा अभाव आहे. गटारी सांडपाणी आणि कचर्‍याने भरल्या आहेत. 

डेंग्युची लक्षणे व उपचार

हा आजार डासापासून फैलावतो. डेंग्यु झालेल्याला चावलेला डास निरोगी व्यक्तीस चावल्यास याची लागण होते. यातून रोगाचा प्रसार होतो. सतत ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी यासारखी लक्षणे आढळून येतात. उपरोक्त लक्षणे आढळल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

देशभरात डेंग्युची साथ असून स्थानिक पातळीवर उपाययोजना आखण्यात येत आहे. देशात कर्नाटक डेंग्यु तापाबाबत तिसर्‍या क्रमांकावर आहे. यामुळे आरोग्य विभागाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. दोन वर्षापूर्वी जिल्हा इस्पितळात यासाठी खास कक्ष खुला करण्यात आला होता. त्या ठिकाणी उपचार करण्यात येत असत.