होमपेज › Belgaon › डॉक्टरांच्या संपामुळे अर्भकाचा मृत्यू?

डॉक्टरांच्या संपामुळे अर्भकाचा मृत्यू?

Published On: Jul 29 2018 1:20AM | Last Updated: Jul 29 2018 12:39AMबेळगाव  : प्रतिनिधी

खासगी डॉक्टरांच्या संपामुळे शहरातील एका नामांकित इस्पितळात एक दिवसापूर्वी जन्मलेल्या बालकाचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. या बालकाच्या पालकांनी इस्पितळाच्या हलगर्जीपणामुळे बालकाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप केला आहे. मात्र, इस्पितळ प्रशासनाने सदर आरोप फेटाळून लावला आहे. 

येथील एका नामांकित इस्पितळात गोकाकच्या दाम्पत्याने मुलाला श्‍वसनाचा त्रास असल्याने दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान  बालकाचा मृत्यू झाल्याने बालकाच्या पित्याने इस्पितळातील डॉक्टरांविरोधात संताप व्यक्त केला आहे.

डॉक्टरांनी संपामुळे मुलाची तपासणीच केली नसल्याने मृत्यू झाल्याचे त्याने म्हटले आहे.  मात्र डॉक्टरांनी सदर आरोप फेटाळून लावले आहेत. मुलाला यापूर्वीच इस्पितळात उपचारासाठी दाखल केले असता तो कदाचित वाचला असता. मुलाला दाखल केल्याबरोबरच तपासणी करण्यात आली आहे. मात्र त्याची प्रकृती आधीच चिंताजनक होती, आम्ही सारे प्रयत्न केले, तरीही त्याचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी सांगितले.