Tue, May 21, 2019 00:27होमपेज › Belgaon › प्रत्येक मतदारसंघासाठी स्वतंत्र जाहीरनामा

प्रत्येक मतदारसंघासाठी स्वतंत्र जाहीरनामा

Published On: Mar 16 2018 1:23AM | Last Updated: Mar 16 2018 1:23AMबंगळूर : प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र जाहीरनामा प्रसिध्द करणार आहे. स्वतंत्र जाहीरनाम्याचा हा प्रयोग देशात प्रथमच राबविण्यात येत आहे. 

विधानसभा निवडणुकीत वेगवेगळे प्रयोग राबवित असलेला भाजप आता जाहीरनाम्यावर लक्ष केंद्रीत करीत आहे. संपूर्ण राज्यात एक विचार घेऊन निवडणुकीत उतरण्याऐवजी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील समस्या, आशा-आकांक्षा विचारात घेऊन हा जाहीरनामा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी नवकर्नाटक लोकहित शक्ती’ अभियान राबवून एक लाख लोकांचे अभिप्राय नोंदवून घेण्यात आले आहेत. यामध्ये प्रभावशाली व्यक्ती, विचारवंत, युवक, महिला आणि सामान्य जनतेचा समावेश आहे. त्यांचे अभिप्राय शास्त्रोक्तरित्या नोंदवून घेऊन सर्व 224 मतदारसंघासाठी वेगवेगळे जाहीरनामे प्रसिध्द करण्यात येणार आहेत. बंगळूर येथे 70 जणांची तंत्रस्नेही टीम या जाहीरनाम्याला अंतिम स्वरुप देत आहे. 

विधानसभा मतदारसंघनिहाय जाहीरनामा तयार करण्यासाठी दोन पथकाद्वारे तीन टप्प्यातील शास्त्रोक्त प्रक्रिया अवलंबिण्यात येत आहे. मतदारसंघ निहाय झालेल्या चिंतन बैठकीत प्रत्येकाने दिलेल्या सूचना 40 जणांचे पहिले पथक एक्सेल शीटमध्ये नोंदवत (डाटा डिजिटायझेशन) आहे.  सूचना केलेल्याचे नाव, मोबाईल क्रमांक, सूचनेचे स्वरुप, वर्गवारी (उदा. कृषी) उपवर्गवारी (उदा. कर्जमाफी, जलसिंचन खते) आदी माहितीचे एकत्रिकरण करण्यात आले आहे. 

दुसरे पथक हे जाहीरनामा समिती मसुदा (मॅनिफेस्टो ड्राफ्टींग) तयार करण्याचे काम वरील माहितीच्या आधारे करीत आहे. जनतेचे प्राधान्य कशाला आहे हे याद्वारे स्पष्ट होते. तिसर्‍या टप्प्यात जाहीरनामा तयार करुन स्थानिक नेत्यांशी चर्चा करुन त्यावर ठोस उपाययोजनेची घोषणा करण्यात येणार आहे. घोषणेची पूर्तता होण्यायोगी असावी यावरही भर देण्यात येत आहे. 

सध्या विधानसभा तमदारसंघनिहाय जाहीरनामा तयार करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु होते. मल्लेश्वरचे आ. सी. एन. अश्वत्थनारायण यांच्या नेतृत्वाखाली सर्व मतदारसंघात 400 ते 500 जणांची चिंतन बैठक घेण्यात येत आहे. 160 मतदारसंघातील माहिती संग्रहीत झाली असून 80 मतदारसंघासाठी जाहीरनामा मसुदाही तयार आहे. मार्च अखेर सर्व मतदारसंघाचा स्वतंत्र जाहीरनामा तयार असेल, असे राज्य भाजप माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक आणि युवा उद्योजक के. एम. अमरेश यांनी सांगितले. 

व्हिजन डॉक्युमेंटरी

मतदारसंघातील मुख्य समस्या किंवा आशा-आकांक्षा याना अनुसरुन प्रत्येक मतदारसंघासाठी व्हिजन डॉक्युमेंटरी तयार करण्यात येणार आहे. पाणी समस्या निराकरणाची गरज असलेल्या चित्रदुर्ग जिल्ह्यासाठी दुष्काळमुक्त चित्रदुर्ग या नावाने जाहीरनामा प्रसिध्द करण्यात येणार आहे. 

५० टक्के जागांवर नवे चेहरे

निवडणुकीत भाजप 50 टक्के जागांवर नव्या चेहर्‍यांना संधी देणार आहे. 40 वर्षांच्या आसपास वय असलेल्या आणि भ्रष्टाचारचा कोणताही आरोप नसलेल्या स्वच्छ प्रतिमा असणार्‍या युवकांना उमेदवारी देण्याचा पक्षश्रेष्ठींचा विचार आहे. याद्वारे मतदारांच्या मनात आश्‍वासक प्रतिमा निर्माण होईल असा त्यांचा होरा आहे. केजेपीने गेल्या निवडणुकीत नव्या चेहर्‍यांना संधी दिली होती. या पक्षाने केवळ 6 जागा पटकावल्या होत्या तरीही 30.69 लाख मते मिळविले होती. भाजपने 40 जागा जिंकून 62.36 लाख मते घेतली होती. त्यामुळे भाजपने नव्या चेहर्‍याची रणनिती राबविण्याचा निर्णय घेतला आहे.