Fri, May 29, 2020 01:03होमपेज › Belgaon › वाढीव वेतनाला होणार विलंब

वाढीव वेतनाला होणार विलंब

Published On: May 23 2018 1:07AM | Last Updated: May 22 2018 8:51PMबेळगाव : प्रतिनिधी

यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारी कर्मचार्‍यांना सहावा वेतन आयोग लागू करण्याचे माजी मुख्यमंत्र सिद्धरामय्यांनी जाहीर केले होते. मात्र, वाढीव वेतन मे महिन्यात मिळण्याची शक्यता कमी असून नव्या सरकारकडून घेतल्या जाणार्‍या निर्णयानुसार ते मिळणार आहे.विविध खात्यांतील कर्मचार्‍यांचे वेतन ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टीम (एचआरएमएस) वर अपलोड करण्याचे काम बहुतांशी पूर्ण झाले आहे. त्यामध्ये वाढीव वेतनाचा उल्‍लेख नाही. त्यामुळे नव्या सरकारकडूनच याबाबतचा आदेश दिला जाणार असल्याची माहिती अर्थ खात्याने दिली आहे.

राज्य सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन 30 जूनपूर्वी निश्‍चित करावे. 2018ची सुधारित वेतनश्रेणी आणि पेन्शन 1 एप्रिलपासूनच लागू करावी, असे परिपत्रक अर्थ खात्याच्या मुख्य सचिवांनी सर्व खातेप्रमुखांना पाठविले आहे. एकूण साडेपाच लाख सरकारी कर्मचारी तसेच अनुदानित शिक्षण संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था पदवी महाविद्यालय, विद्यापीठातील 73 हजार शिक्षकेतर कर्मचार्‍यांना  लाभ होणार आहे. जुलै 2017 पासून तीस टक्के वेतनवाढीची शिफारस केली करण्यात आलेली आहे. 

महागाई भत्ताही विलंबाने

जानेवारीपासून लागू केलेल्या वाढीव महागाई भत्ता कर्मचार्‍यांना मिळालेला नाही. वेतनवाढ करताना 45.25 टक्के महागाई भत्ता मूळ वेतनात समाविष्ट करण्यात आला आहे. सुधारित वेतनश्रेणीमुळे महागाई भत्ता दिला जात नाही. केंद्र सरकारने जानेवारीपासून 2 टक्के महागाई भत्ता जाली केला आहे. त्यानुसार राज्य सरकारकडून 0.94 टक्के भत्ता निश्‍चित करावा, अशी शिफारस वेतन आयोगाने केली होती. त्यावर नव्या सरकारकडून निर्णय होण्याची अपेक्षा आहे.