Fri, Mar 22, 2019 08:00होमपेज › Belgaon › भेसळयुक्त विषारी दुधाचा वाढता धोका !

भेसळयुक्त विषारी दुधाचा वाढता धोका !

Published On: Dec 03 2017 1:09AM | Last Updated: Dec 02 2017 11:20PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

दुधात भेसळ करुन कृत्रिम दूध तयार करुन भरमसाठ दराने विकणारे पांढर्‍या दुधातील काळे बोके आपले उखळ पांढरे करुन घेत आहेत.जनतेच्या आरोग्याशी खेळत पांढर्‍या दुधाच्या नावावर काळा धंदा करणार्‍या गुन्हेगारांच्या टोळ्या उदयास आल्या आहेत. प्रशासनाचा वचक नसल्याने भेसळयुक्त विषारी दुधाचा धोका वाढू लागला आहे. कोनवाळ गल्ली येथील गवळ्याने जादा दुधाच्या लालसेपोटी केलेल्या कारनाम्यानंतर बेळगाव परिसरातील नागरिकांत खळबळ माजली आहे.

देशातील तब्बल 68 टक्के दुधातील भेसळ ही आरोग्याला धोकादायक आहे. आरोग्याला हानिकारक दुधामुळे एखाद्याचा जीव जात नाही तोपर्यंत कारवाई होत नाही.दुधातील भेसळ रोखण्यात केंद्र आणि राज्य शासन अपयशी ठरल्याची माहिती केंद्रीय पशुकल्याण मंडळाचे सदस्य मोहन अहलुवालिया यांनी संसदेत दिली होती. 

काही वर्षांपूर्वी रायबाग, अथणी आणि चिकोडी तालुक्यांत आरोग्याला हानिकारक भेसळयुक्त दुधाचे प्रकार उघडकीस आले होते. युरिया, दुधाची पावडर आणि अन्य रसायने मिसळून आरोग्यास घातक ठरणार्‍या दुधाचा धंदा बेलगामपणे सुरु होता. तीन तालुक्यात  भेसळयुक्त दुधाच्या धंद्यावर कारवाई झाली. हानिकारक दुधाचा थेट परिणाम माणसाच्या मेंदू आणि हृदयावर होत असतो.

काही वर्षांपूर्वी घडलेल्या हानिकारक दुधाच्या गोरखधंद्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने दूध व्यवसायावर पाळत ठेवणे आवश्यक होते. सणासुदीच्या काळात सर्वांच्या तोंडाला स्वाद देणार्‍या मिठाईत भेसळ असते. आरोग्याला हानिकारक खवा आणि खाद्यतेलातून बनविल्या जाणार्‍या मिठाईची चव विषारी असल्याचे कुणालाही कळत नाही.ज्यांना याची माहिती असते ते अन्न भेसळ नियंत्रण मंडळ खास डब्यातून आलेल्या कागदी मिठाईत मश्गुल असते.

भेसळयुक्त  दूध आणि मिठाईमुळे जनतेचे आरोग्य धोक्याच्या मार्गावर असताना प्रशासन सर्व काही आलबेल असल्याचा निर्वाळा देत असते.दुभत्या जनावरांना हानिकारक ठरणार्‍या बंदी असलेल्या ऑक्स्टोसीन औषधांची विक्री बेळगावात होत असल्याची माहिती औषध विभाग आणि गुन्हे अन्वेषण विभागाला सहा महिन्यांपूर्वीच मिळाली होती.मिळालेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी प्रशासनाला सहा महिन्यांचा अवधी घ्यावा लागला. मात्र, याच काळात हानिकारक औषधांमुळे हजारोंच्या आरोग्याचा धोका वाढला त्याची काळजी कोणालाच राहिली नाही.

केंद्र सरकारने ऑक्स्टोसीन औषधे जनावरांसाठी वापरण्यावर बंदी आणली आहे. मात्र, बेळगावातील गवळ्याने बंदी असलेल्या औषधांचा धंदाच चालविला होता. जनावरांच्या आरोग्याला हानिकारक असलेल्या त्या औषधांच्या विक्रीतून अनेक जण मालामाल झाले तरी निष्पाप नागरिकांचे आरोग्य कंगाल झाले  आहे. 

भेसळ शहरापासून खेड्यापर्यंत

सीलबंद प्लास्टिक पिशवीतील दूधही सुरक्षित राहिलेले नाही. दूध अधिक वेळ ताजे राहण्यासाठी त्यात सोडियम बायकार्बोनेट किंवा सोडियम हायड्रॉक्साईड मिसळले जाते. दूध पिशव्यातील भेसळ शहरापासून खेड्यांपर्यंत पोहोचली आहे. काही सोप्या चाचणीतून आपण दुधातील भेसळ ओळखू शकतो. नासलेल्या दुधाचा रंग निळा झाल्यास त्यामध्ये स्टार्च मिसळल्याचे समजावे. त्याचप्रमाणे दुधामध्ये लिटमस पेपर निळा झाल्यास त्या दुधात सोडा मिसळलेला समजावा.

जनावरांबरोबर माणसांवरही दुष्परिणाम

ऑक्स्टोसीन औषधांचे दुष्परिणाम जनावरांबरोबरच माणसांवरही होत असतात. ज्यादा दुधाच्या आशेने ती औषधे दुभत्या जनावरांना दिली जातात. मात्र, त्यामुळे जनावरांना कॅन्सरचा धोका असतो. तसेच अशा दुधाच्या सेवनामुळे  मुलांना कावीळ तसेच मेंदूचा रक्तपुरवठा कमी होतो. पुरुषांमधील रोग प्रतिकारक शक्ती कमी होते. स्त्रियांना गर्भाशय आणि स्तनाचा रोग संभवतो. दुधाची घनता वाढविण्यासाठी त्यात युरिया, मालरोटेक्स, ग्लुकोज, मक्याचा स्ट्रार्च, साबुदाणे किंवा दुधाची भुकटी, लॅक्टो असे घटक मिसळले जातात. हे घटक वापरल्यामुळे दुधात दुप्पट पाणी मिसळूनही घनतेवर परिणाम होत नाही. स्निग्धांश वाढविण्यासाठी त्यात खाद्यतेलही वापरले जाते.