Tue, Apr 23, 2019 18:13होमपेज › Belgaon › वाढती ‘गुन्हेगारी’ रोखणार का?

वाढती ‘गुन्हेगारी’ रोखणार का?

Published On: Jan 07 2018 8:45PM | Last Updated: Jan 07 2018 8:45PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव शहर शैक्षणिक, औद्योगिक, कृषी, व्यापारी, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते. विविध क्षेत्रांमध्ये बेळगाव शहराचा जसा नावलौकिक आहे तसा उलट बाजूने अनेक मोठमोठ्या गुन्ह्यांच्या मालिकेमुळे बेळगाव शहर गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनले आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी बेळगावला पोलिस आयुक्तालय सुरु करण्यात आले. पोलिस आयुक्तालयाच्या कारभारानंतरही शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण घटलेले नाही. त्यामुळे नवे पोलिस आयुक्त डी. सी. राजप्पा वाढत्या गुन्हेगारीला रोखणार का? असा सवाल शहरवासीयांतून होत आहे.

खून, दरोडे, महिलांवरील अत्याचार, महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणे, घरफोडी, वाहनांच्या काचा फोडून पैसे लांबविणे आदी गुन्ह्यांनी बेळगाव शहरात थैमान घातले आहे. यातच वारंवारच्या जातीय तणावाला जनता कंटाळली आहे. गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्यामुळे शहरात पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाल्याचेच स्पष्ट होत आहे. अनेक मोठमोठ्या गुन्ह्यांचा तपास रखडला आहे.

सरकारकडून पोलिसांच्या कार्यक्षमतेकडे व त्यांच्या तपास कामाकडे म्हणावे तसे लक्ष दिले जात नसल्यामुळेच अनेक अधिकारी पोलिस स्टेशनचे अन् उपविभागांचे सरदारच बनले आहेत. काही भ्रष्ट अधिकारी बेकायदा वाळू पुरवठ्याचे भागीदारच बनले असल्याची चर्चा आहे.

शहर आणी जिल्ह्यात वाळू माफियांनी थैमान घातले आहे. काही राजकीय धेंडांबरोबर काही पोलिस अधिकारीही वाळू माफियांशी संधान बांधून आहेत.  बेकायदेशीर व गैरव्यवहारांचे अनेक प्रकार पोलिसांच्या आशीर्वादाने चाललेले असल्याची सातत्याने चर्चा असते. मटका, जुगाराबरोबरच शहरात अंमली पदार्थांची खुलेआम विक्री होत आहे. वाटमार्‍यांना ऊत आला आहे. काळ्या धंद्यातील बड्या धेंडांना सोडायचे व किरकोळ गुन्हा केलेल्यांवर कारवाई केल्याचा फार्स चालू असतो.

हिवाळी अधिवेशन काळात राज्याचे मंत्रिमंडळ बेळगावात तळ ठोकून असताना शहरात जातीय  दंगलीचा वणवा पेटला. शहराला सातत्याने जातीय तणावाला सामारे जावे लागत असताना समाजकंटकांच्या कारवाया रोखण्यात पोलिस प्रशासनाला साफ अपयश आले आहे.अशावेळी नवे पोलिस आयुक्त राजप्पा बेळगाव शहरातील गुन्हेगारीला कसा आळा घालणार, याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

गुन्हेगार वरचढ ठरत आहेत का?

पाच वर्षांपूर्वी अनगोळमधील शालेय विद्यार्थी गगन सोमणाचे या मुलाचा गळा चिरून खून करण्यात आला होता. त्या खुनाचा अद्याप तपास लागलेला नाही. कसाई गल्लीतील सोनाली गुंडप या शालेय मुलीचा काही वर्षांपूर्वी अत्याचार करून खून करून तिचा मृतदेह किल्ल्यातील झुडुपात फेकून देण्यात आला होता. एका कापड दुकानातील सेल्समनचा भरतेश हायस्कूलच्या मैदानावर चाकूने वार करून निर्घृणपणे खून करण्यात आला होता. त्याचाही पोलिसांना तपास लावता आलेला नाही. सात महिन्यांपूर्वी टिळकवाडी येथील महिलेचा भरदिवसा खून करण्यात आला. त्या प्रकरणातील खुन्याचा शोध लागलेला नाही. यातून पोलिसांपेक्षा गुन्हेगार वरचढ ठरत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.