Tue, Jul 23, 2019 10:29होमपेज › Belgaon › वाढत्या गुन्ह्यांमुळे शहर भीतीच्या छायेत

वाढत्या गुन्ह्यांमुळे शहर भीतीच्या छायेत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीमुळे शहर भीतीच्या छायेखाली वावरत आहे. पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने गुन्हेगारीचा आलेख वाढताच आहे. शहरात पोलिस आयुक्‍तालय असूनही वाढती गुन्हेगारी रोखण्यापासून पोलिसांना अपयश आलेले दिसते. याला आळा बसण्यासाठी पोलिस प्रशासनाने ठोस उपाययोजना आखणे गरजेचे आहे. 

सिंधी कॉलनीत सोमवारी क्षुल्लक वादातून युवकावर हल्ला झाला. वैभव न्हावी (वय 31 रा. विनायकनगर) असे जखमी युवकाचे नाव आहे. आधी केस न कापल्याच्या रागातून हा खुनीहल्ला झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हल्ल्यानंतर वैभवच्या घरावर दगडफेक तसेच वाहनाची नासधूस केल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. कॅम्प पोलिस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून पोलिस तपास करीत आहेत. 

काही दिवसांपूर्वी खडक गल्ली, घी गल्ली भागात जातीय दंगल झाली होती. यावेळी अनेकांच्या दुचाकींचे नुकसान करण्यात आले होते. खडक गल्ली परिसरात वारंवार अशा घटना घडत राहतात. यामुळे सध्या या परिसरात पोलिस प्रशासनाकडून सीसीटीव्ही बसविले आहेत. या भागात पोलिसांनी पेट्रोलिंग करणे गरजेचे असल्याचे बोलले जाते. 

वर्षभरापूर्वी काकतीजवळील जंगलात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले होते. मात्र, काही महिन्यांनंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या स्थिती निर्माण झाल्याची चर्चा शहरात आहे. 

शहरात आयुक्‍तालयाची स्थापना करून दोन वर्षे उलटली. तरीदेखील गुन्हे कमी होताना दिसत नाहीत. शहर, उपनगरात रोज एकतरी गुन्ह्याची नोंद असतेच. यामुळे शहरवासीयांतून घबराटीचे वातावरण आहे. घरफोडी, मंदिरात चोरी, चेन स्नॅचिंग या रोजच्याच घटना बनल्या आहेत. यामुळे पोलिस म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ आहे.  वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवर आळा बसण्यासाठी पोलिस प्रशासनाने ठोस उपाययोजना आखणे गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही.