Thu, Feb 21, 2019 09:03होमपेज › Belgaon › तंदुरुस्तीसाठी निपाणीत योगाचा वाढता प्रसार

तंदुरुस्तीसाठी निपाणीत योगाचा वाढता प्रसार

Published On: Jun 21 2018 1:26AM | Last Updated: Jun 20 2018 10:32PMनिपाणी : राजेश शेडगे

निपाणीसह परिसरातील नागरिक आपल्या आरोग्याविषयी जागरूक झाले आहेत. अधिक नागरिक सकाळी लवकर उठून फिरायला जाणे, योगा क्‍लास करणे, सायकलिंग करणे पसंत करत आहेत. तरूणाईला जीमचे आकर्षण आहे.  आज जागतिक योगा दिनाचे औचित्य साधून श्रीपेवाडी रोडवरील शिवशंकर जोल्ले पब्लिक स्कूलच्या मैदानावर विक्रमी योगा डे साजरा केला जात आहे. निपाणीकरांचे तंदुरूस्तीकडे अधिक लक्ष दिसून येत आहे.

भारतीय योगामध्ये शरीर, मन आणि आत्मा यांना आरोग्य देणारी पद्धत असल्याने निपाणी शहरात अलिकडे योगाचा प्रसार आणि प्रचार होताना दिसत आहे. शहरात दोन वर्षापूर्वी कै. संगमदेव स्वामीजींनी योगाचे धडे दिले होते. त्यांच्या अपघाती निधनानंतर  समाधीमठाचे  प्राणलिंग स्वामीजी, प्रवीण पाटील, अरूण चव्हाण, परसण्णावर, अ‍ॅड. राम चव्हाण, गजानन शिंदे, अरविंद हराळे, जे. डी. शिंदे, प्रशांत रामनकट्टी, आशा तिळवे, दशरथ कुंभार यासारख्या योगाचार्यांकडून निपाणीकर नागरिकांना योगाचे प्रशिक्षण दिले जात असल्याने अनेक निपाणीकर आता तंदुरूस्त होण्यासाठी योगा क्‍लासला जात आहेत. 

मराठा मंडळ, अक्कमहादेवी कल्याण मंडप, बिरदेव मंदिर, पंत मंदिर, प्रतिभानगर उद्यान, वीरभद्रेश्‍वर मंदिर व श्रीपेवाडी येथे विविध योग तज्ञांकडून मोफत योगा क्‍लास घेतला जात आहे. योगामुळे शारीरिक आणि मानसिक त्रासाला आवर घालण्याबरोबर मनुष्याची मानसिकता बदलणे, हिंसक प्रवृत्ती बदलण्याचे काम होते. यातून समाजात एकी आणि एकरूपता आणून स्वास्थ वाढविण्यासाठी मदत होते. पतंजली मुनी आणि भारतीय ऋषीमुनींनी प्राचीन काळापासून अभिप्रेत असलेला योग जगासमोर मांडणे आवश्यक आहे. रोज विविध योगासने करणे जमत नसलेल्यांनी सूर्यनमस्कार घालावा. दिर्घश्‍वसन, प्राणायाम, कपालभाती, अनुलोम विलोम  शिकून घेेतल्यास अनेक व्याधींवर मात करता येते. 

योगासन ही महत्वाची आणि रोज सराव करण्याची पायरी आहे. धरसोड वृत्ती करीत योगासने केेली तर यातून अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. योग तज्ञांच्या  मार्गदर्शनाखाली किंवा रामदेव बाबा यांचे आस्था चॅनेलवरील योगासने पाहून अनेकजण योगाच्या मागे लागले आहेत.