Tue, Jul 16, 2019 22:03होमपेज › Belgaon › मतदानाचा वाढला टक्‍का, कोणाला धक्‍का ?

मतदानाचा वाढला टक्‍का, कोणाला धक्‍का ?

Published On: May 14 2018 1:42AM | Last Updated: May 14 2018 12:20AMबेळगाव : प्रतिनिधी

ग्रामीण मतदारसंघात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.  77 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजाविला. यामुळे हा वाढलेला टक्‍का कोणाला साथ देणार, याबाबत तर्कवितर्क व्यक्‍त करण्यात येत आहे. मराठी मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीवर ग्रामीण मतदार संघाचे विजयाचे गणित अवलंबून आहे.

मराठी मतदारांची अधिक प्रमाणात भरणा असणार्‍या पश्‍चिम भागात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. हिंडलगा, कंग्राळी (खु.), कंग्राळी (बु.), उचगाव, बागेवाडी, मुतगा, सुळेभावी, हालगा ही गावे या भागात प्रामुख्याने मतदारसंघाचा निकाल फिरवणारी प्रमुख गावे आहेत. येथील मतदारांच्या कौलावर निकाल अवलंबून असतो. परिणामी या परिसरात झालेल्या मतांची गोळाबेरीज करण्यात कार्यकर्ते गुंतले आहेत.

एकीकडे शेजारच्या  मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी घसरली असताना ग्रामीण भागातील मतदारांनी भरभरून मतदान केले आहे. हा वाढलेला टक्‍का अनेक तर्कविर्तकाना धक्‍का लावणारा ठरणार आहे.

भाजपच्या ताब्यात असणारा मतदारसंघ हिसकावून घेण्यासाठी म. ए. समिती व काँग्रेसने जोरदार प्रयत्न केले आहेत. त्यानुसार रणनीती आखून प्रयत्न केले असून यामुळे तिन्ही पक्षाच्या समर्थकाकडून विजयाचा दावा केला जात आहे. वाढलेला टक्‍का आपल्यालाच मदतीचा हात देणारा ठरणार असल्याचा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे.

मराठी पट्टा म्हणून ओळखल्या जाणार्‍या पश्चिम भागात राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांनी बर्‍यापैकी बस्तान बसविले आहे. त्यांना काही गावांतून मताधिक्य मिळेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. विजयासाठी म. ए. समितीला या भागातून मताधिक्य मिळण्याची आवश्यकता आहे. पूर्व भागातील मराठी गावातून म. ए. समितीला चांगला प्रतिसाद लाभल्याचे दिसून  येत आहे. तर भाजप-काँग्रेेसच्या समर्थकाकडूनही चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. यावेळी प्रथमच कानडी भागातून म. ए. समितीला चांगला प्रतिसाद लाभला आहे. मराठा जातीचे कार्ड याठिकाणी प्रभावी ठरण्याची शक्यता वर्तविण्यात दावा करण्यात येत आहे. 

मतदानाच्या तोंडावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, भाई प्रा. एन. डी. पाटील यांच्या सभा झाल्या. यातून वातावरण ढवळून निघाले. याचा फायदा कोणत्या उमेदवाराला होणार, याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. बड्या नेत्यांच्या आव्हानांचे मतात रुपांतर होणार का, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. तिन्ही उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढत रंगली असून किती मतदार कोणत्या उमेदवाराच्या मागे उभे राहणार, हे मंगळवारी स्पष्ट होणार आहे.