Tue, Jul 23, 2019 10:32होमपेज › Belgaon › आधीच टंचाई, त्यात प्रदूषणाची भर

आधीच टंचाई, त्यात प्रदूषणाची भर

Published On: Feb 27 2018 2:05AM | Last Updated: Feb 26 2018 10:13PMखानापूर : वासुदेव चौगुले

मुबलक पाणी असतानाही प्रदूषणामुळे तालुक्यात पाणीटंचाई आणि रोगराईचा प्रादुर्भाव वाढला आहे. जलशुद्धीकरण केंद्रांचा अभाव आणि पिण्याच्या पाण्याच्या शुद्धीकरणाकडे स्थानिक  स्वराज्य संस्थांचे दुर्लक्ष यामुळे ही समस्या आणखी बिकट बनते आहे. आगामी उन्हाळ्याची दाहकता आतापासूनच जाणवत आहे. या पार्श्‍वभूमीवर पाणी प्रदूषणमुक्त खानापूर तालुक्यासाठी सामूहिक पातळीवर पुढाकार घेण्याची गरज आहे.

अनेक नदी-नाल्यांचे उगमस्थान असलेल्या खानापूर तालुक्यात पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर असणे ही शोकांतिका आहे. तालुक्याची जीवनदायिनी असणारी मलप्रभा प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. खानापूरचे दूषित पाणी नदीत सोडले जाते. नदीला जोडणार्‍या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाळूउपसा होतो. बाहेरील कचरा व सॉलिड वेस्टसह इतर दूषित पदार्थ  पाण्यात सोडण्याचे प्रकारही वाढले आहेत.

वाळूउपशाने तालुक्यातील पाण्याचे सर्वाधिक प्रदूषण होत असल्याचे भूगर्भतज्ज्ञांचे म्हणणे आहे. हे पाणी जनावरे आणि शेतीसाठीही धोकादायक आहे. तालुक्यातील बहुतेक नाल्यांवर गावांना पाणीपुरवठा करणार्‍या योजना आहेत. परिणामी पाण्याच्या प्रदूषणाचा फटका लोकांनाही बसत आहे. तालुक्यात मलप्रभेसह म्हादई, मंगेत्री, काळी-पांढरी, मार्कंडेय यासह हलथर, कळसा, भांडुरा, बैलओहोळ, निट्टूर नाला, कुंभार ओहोळ आदींसह अनेक नाले आहेत. प्रत्येक नाल्यावर किमान एकातरी गावाचा पाणीपुरवठा अवलंबून आहे.

मार्च-एप्रिल दरम्यान शेतीकामे आणि विटांचे उत्पादन यासाठी मोठ्या प्रमाणात जनता शिवारात वास्तव्यास असते. मिळेल तेथील पाण्यावर तहान भागविणे नागरिकांना भाग पडते. यामुळेदेखील आजारांत वाढ होत आहे. उन्हाळ्यात दूषित पाण्याच्या वापराने आजारी पडण्याचे प्रमाण मागील चार वर्षांत वाढले आहे.

विविध कारणांनी जलसमृद्ध  खानापूर तालुक्यालादेखील पाणी प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी केवळ जलशुद्धीकरण केंद्रांची व्यवस्था करण्याऐवजी आपापल्या अखत्यारितील नदी-नाले आणि जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी प्रयत्नरत राहायला हवे.

लोहाचे अधिक प्रमाण चिंताजनक

मूत्रखडा, घसा आणि पोटाचे आजार झालेला रुग्ण बेळगावातील कोणत्याही डॉक्टरकडे गेल्यास तुम्ही अमुक गावातून आला आहात का,  असा प्रश्‍न डॉक्टर करतात.  तालुक्यातील विशिष्ट गावांमधील पाण्यात विशिष्ट घटकांचे प्रमाण अधिक आहे. लोंढा भागातील पाण्यात लोहाचे प्रमाण वाजवीपेक्षा जास्त आहे. यामुळे या भागातील लोकांमध्ये  मूत्रखडा आणि श्‍वसनाचे आजार आढळून येतात. गर्लगुंजी, कुप्पटगिरी आणि पूर्व भागातील अनेक गावांत पोटदुखीने त्रस्त रुग्णांची संख्या अधिक आहे.

बहुतांश जलशुद्धीकरण केंद्रे बंदच !

प्रत्येक ग्राम पंचायतीद्वारे गावागावात लाखो रुपये खर्चून जलशुद्धीकरण केंद्रांची उभारणी केली आहे. जनतेला शुद्ध पेयजलपुरवठा व्हावा, यासाठी अत्याधुनिक जलशुद्धीकरण तंत्राचा वापर करण्यात आला आहे. मात्र खानापूर तालुक्यातील 80 टक्के केंद्रे बंद आहेत. योग्य रीतीने या केंद्रांचे निर्वहन केल्यास उन्हाळ्यात ही केंद्रे नागरिकांसाठी वरदान ठरतील. या ठिकाणी अधिकारी व ग्रा.पं सदस्यांकडून जबाबदारीने काम झाले पाहिजे.