होमपेज › Belgaon › पेरणीमुळे बैलजोड्यांना वाढली मागणी

पेरणीमुळे बैलजोड्यांना वाढली मागणी

Published On: Jun 02 2018 2:01AM | Last Updated: Jun 01 2018 7:41PMबेळगाव : प्रतिनिधी

यंदा दमदार वळिवाचा पाऊस झाला. एप्रिल आणि मे महिन्यात अनेकदा जोरदार पाऊस झाला. मान्सूनपूर्व पावसानेही दमदार हजेरी लावली. यामुळे शेतीकामांना सुरुवात झाली असून बैलजोड्यांची कमतरता भासत आहे. काहीजण भाडेतत्त्वावर बैलजोड्या घेत असून त्यासाठी मालकांकडून वाढीव दर आकारले जात आहेत.

दुष्काळ आणि कर्जाच्या बोजामुळे याआधी अनेक शेतकर्‍यांनी जनावरे विकली होती. यंदा मान्सूनपूर्व पावसाचे प्रमाण चांगले राहिले. तर वेळेआधीच मान्सून दाखल होत असल्याने शेतकर्‍यांनी पेरणीची तयारी केली आहे. सर्वच ठिकाणी कामे सुरू असल्याने बैलजोड्यांना मागणी वाढली आहे. 

बाजारपेठेतील बैलजोड्यांचा सध्याचा दर 32 ते 65 हजार रुपये आहे. त्यामुळे दिवसा 850 ते 1350 रुपयांपर्यंत भाडे आकारले जात आहे.बैलजाड्यांअभावी शेतकर्‍यांची अडचण निर्माण झाल्याने वाढीव भाडे दर देण्यास ते तयार आहेत.

जिल्ह्यामध्ये एकूण 2.45 लाख हेक्टर जमिनीत ऊस लागवड होत आहे. 4 लाख हेक्टर जमिनीत पावसावर आधारित पिके घेतली जात आहेत. यापैकी 1 ते 5 एकरपर्यंत जमीन असणारे शेतकरी शेतीकामांसाठी ट्रॅक्टरचा वापर करत नाहीत. बैलजोड्यांचा उपयोग ते करतात. दहा एकरपेक्षा जास्त जमीन असणारे शेतकरी शेती कामांसाठी ट्रॅक्टर वापरून आधुनिक पद्धतीने शेती करतात. त्यामुळे पेरणीसाठी बैलजोड्यांना वाढती मागणी असल्याचे कृषी अधिकारी सांगतात. 

मूग, शेंगा, तूर  अशा खरीप पिकांसाठी बैलजोड्यांचा वापर करून केलेल्या पारंपरिक पेरणीमुळे जास्त उत्पन्न मिळते, असा शेतकर्‍यांचा समज आहे. त्यामुळे वाढीव भाडे भरून बैलजोड्यांच्या सहाय्याने पेरणी केली जात आहे. एकाचवेळी सर्व ठिकाणी कामे सुरू असल्याने बैलजोड्या मिळविण्यासाठी शेतकर्‍यांची दमछाक होत आहे.

पेरणी क्षेत्र वाढले

गेल्या दोन वर्षात खरीप आणि रब्बी हंगामात चांगला पाऊस झाला. त्यामुळे 6.79 लाख हेक्टरपर्यंत पेरणी क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्यातील 35 विभागात पावसावर आधारित विविध पिके घेतली जातात. 52 हजार हेक्टरमध्ये तूर, 31.40 हजार हेक्टर मूग, 34.07 हजार हेक्टर शेंगा, 36.25 हजार हेक्टर सूर्यफूल, 94 हजार हेक्टर मका, 50 हजार हेक्टर बाजरी, 98.99 हजार हेक्टर सोयाबीन असे पेरणीचे प्रमाण आहे.