होमपेज › Belgaon › भोई गल्लीत घरे सोडून जाण्याची वेळ

भोई गल्लीत घरे सोडून जाण्याची वेळ

Published On: May 17 2018 1:28AM | Last Updated: May 17 2018 12:45AMबेळगाव : प्रतिनिधी

भोई गल्ली, पांगुळ गल्ली, भेंडिबाजार येथे रस्त्याची उंची वाढविल्याने पावसाच्या पाण्याबरोबर सांडपाणी वारंवार घरात शिरू लागल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. स्मार्ट सिटी करावयास निघालेल्या मनपा अधिकार्‍यांच्या नियोजनशून्य कामामुळे येथील नागरिक घरे सोडून जात आहेत. यामुळे भेंडिबाजार ते भोई गल्ली रस्त्याच्या उंचीला विरोध करत नागरिकांनी काम रोखून धरले. 

भेंडिबाजार ते भोई गल्ली दरम्यान गेल्या 50 वर्षात रस्त्याच्या वारंवार नूतनीकरणामुळे याची उंची सुमारे 4 फूट वाढली आहे. सध्या स्मार्टसिटी अंतर्गत नव्या सुरू असलेल्या कामामुळे पुन्हा एक फूट उंचीची भर पडली आहे. यामुळे थोडासा पाऊस पडला तरी पावसाच्या पाण्याबरोबर सांडपाणी सखल घराघरात शिरते. गेल्या महिनाभरात सोमवारी मध्यरात्री तिसर्‍यांदा असा प्रकार घडला. यामुळे येथील नागरिक मनपा प्रशासनाच्या कारभाराबाबत संतप्त आहेत. 

20 दिवसापासून भेंडिबाजार ते भोई गल्ली दरम्यान रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. हा रस्ता अर्धा पूर्ण झाल्यानंतर पावसाळ्यात होणारा त्रास नागरिकांच्या लक्षात येत आहे. यामुळे नागरिकांनी रस्ता होऊ न देण्याचा इशारा दिला आहे. उंची वाढल्याने अर्धा पूर्ण केलेला रस्ताही उखडून टाकून पूर्ववत करण्याची मागणी नागरिकांनी अभियंत्यासह नगरसेविका मीना वाझ यांच्याकडे केली आहे. 

पूर्वी असणार्‍या गटारींची रुंदी  मोठी होती. मात्र सध्या नव्याने करण्यात येणार्‍या गटारींची रुंदी कमी आहे. यामुळे चन्नम्मा सर्कलपासून किमान अर्धा कि.मी.वरील सर्व पाणी भोई गल्ली येथे येते. पाण्याचा प्रवाह पाहता गटारींची रुंदी मोठी पाहिजे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. अजून पावसाळ्याला सुरुवात नसताना ही अवस्था आहे, मुसळधार पावसात घरांची अवस्था म्हणजे पूरसदृश होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.