Mon, Aug 19, 2019 12:06होमपेज › Belgaon › शहरात दोन दिवसांत एक बळी ठरलेला!

शहरात दोन दिवसांत एक बळी ठरलेला!

Published On: Jun 23 2018 1:20AM | Last Updated: Jun 22 2018 8:41PMबेळगाव : सतीश जाधव

शहरात दिवसेंदिवस अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. याची खबरदारी म्हणून वाहतूक पोलिस विभागाकडून नेहमीच उपाययोजना आखण्यात येतात. पण वाहन चालकांच्या निष्काळजीपणामुळे अपघात होतात. बेळगाव शहरात दर दोन दिवसांत एक अपघात बळी होतो. ही स्थिती चिंताजनक आहे. रहदारी विभागाच्या आकडेवारीनुसार मागील अडीच वर्षात 401 जणांना जीव गमवावा लागला आहे. 

शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे व अपघात रोखण्याच्या  दृष्टिकोनातून काही रस्त्यांवर अंतर्गत वाहतूक सुरु करण्यात आली आहे. वाहतुकीच्या दृष्टीने काळजी घेणारी केंद्रे स्थापन केली आहेत. शहरात 105 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांचे फोटो काढण्यासाठी पोलिसांना 130 स्मार्ट फोन देण्यात आले आहेत.

शहरात 2016 ते 2018 (मे) अखेर 401 जणांना जीव गमवावा लागला आहे. यामध्ये 2016 साली प्राणावर बेतणारे अपघात 157, 2017 साली 144, 2018  (मे) साली 58 झाले आहेत. 

2016 साली धोका नसलेले अपघात 659, 2017 साली 538, 2018 (मे) 205 अपघात झाले आहेत. 2016 साली 1009 जखमी, 2017 साली 913, 2018 (मे) साली 375 जखमी झाले आहेत. 2016 साली 176 मृत्यू, 2017  साली 157 व 2018 (मे) पर्यंत 88 मृत्यू झाले आहेत.  

अडीच वर्षात प्राणावर बेतणारे 359, धोका नसलेले 1402, जखमी 2297 जण झाले. 401 जणांचा मृत्यू झाला आहे. ही चिंतेची बाब आहे. शहरात नेहमीच अवजड वाहतुकीचा प्रश्‍न चिंताजनक आहे. शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचाही जीव गेला आहे. यासाठीही वाहतूक विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.

अपघाताची कारणे

वाहनचालकांकडून रहदारी नियमांचे उल्लंघन 
अवजड वाहतूक
वाढती रहदारी 
युवकांची धूम स्टाईल
वेगमर्यादेकडे पोलिसांचे दुर्लक्ष
मोबाईलचा वापर
मद्यप्राशन करून वाहन चालविणे

रहदारी विभागातर्फे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह

रहदारी पोलिस विभागातर्फे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, रिक्षा चालक, बस चालकांना ‘सडक सुरक्षा व जीवन रक्षा’बद्दल माहिती देण्यात येत आहे. वाहतून नियमांचे पालन कसे करावे, प्रत्येकाने हेल्मेटचा वापर करावा, वाहनाची कागदपत्रे सोबत ठेवावीत, 18 वर्षाखालील विद्यार्थ्यांनी वाहन चालवू नये आदीबाबत जागृती  केली जात आहे. याला नागरिकांतून प्रतिसाद मिळत आहे.