डॉ. परमेश्वर यांच्यावर आयकरचे छापे

Last Updated: Oct 11 2019 12:39AM
Responsive image

Responsive image

बंगळूर : प्रतिनिधी

माजी उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्यासह काही प्रदेश काँग्रेस नेत्यांवर प्राप्तिकर अधिकार्‍यांनी छापे घालून तपास सुरू केला आहे. गुरुवारी सकाळी परमेश्वर यांच्यासह आर. एल. जालप्पा यांच्या निवास, कार्यालये आणि संस्थांवर छापे घातले.

तुमकूर येथे परमेश्वर यांचे सिद्धार्थ इंजिनिअरिंग कॉलेज आणि पदवी कॉलेज आहे. त्या ठिकाणी छापे घालून कागदपत्रांचा तपास करण्यात आला. काहीजणांची चौकशीही करण्यात आली. बंगळुरातील सदाशिवनगर येथे असणार्‍या परमेश्वर यांच्या निवासावरही छापा घालण्यात आला. 

आर. एल. जालप्पा यांच्या निवासावर, रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजवर छापे घालण्यात आले. सुमारे दहा अधिकार्‍यांच्या पथकाने कागदपत्रांची तपासणी केली. नेलमंगलातील निजदचे नगरसेवक शिवकुमार यांच्या निवासावरही छापा घालण्यात आला. शिक्षण संस्थांवर छाप्यावेळी सर्व कर्मचार्‍यांना बाहेर जाण्याची सूचना देण्यात आली. त्यानंतर कागदपत्रे तपासण्यात आली. सरकारने ठरवलेल्या शुल्कापेक्ष अधिक शुल्क या संस्थांकडून आकारण्यात येत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. संशयास्पद कागदपत्रे अधिकार्‍यांनी जप्त केली आहेत.

डॉ. परमेश्वर यांचे नातेवाईक  आणि रियल इस्टेट उद्योजक रंगनाथ यांच्या निवास आणि कार्यालयावर छापे घालून चौकशी करण्यात आली. परमेश्वर यांची स्वीय साहाय्यक रमेश यांना बंगळूरहून तुमकूरला बोलावून त्यांच्याकडून बँक खात्यांची माहिती घेण्यात येत आहे. सायंकाळी उशिरापर्यंत प्राप्तीकर अधिकार्‍यांकडून तपास सुरु होता.