Tue, Jun 25, 2019 13:19होमपेज › Belgaon › बेळगावात लक्ष्मी गोल्ड पॅलेसवर प्राप्‍तिकर छापे

बेळगावात लक्ष्मी गोल्ड पॅलेसवर प्राप्‍तिकर छापे

Published On: Jan 05 2018 1:05AM | Last Updated: Jan 04 2018 11:41PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

खडेबाजार येथील लक्ष्मी गोल्ड पॅलेस या सराफी दुकानावर गुरुवारी प्राप्‍तिकर खात्याच्या अधिकार्‍यांनी छापा टाकला. यावेळी काही महत्त्वाची कागदपत्रे जप्‍त करून त्याची तपासणी सुरू केली आहे. हे सराफी दुकान भाजपचे नेते के.पी. नंजुड्डी यांच्या मालकीचे असून बंगळूर व धारवाडमधील लक्ष्मी गोल्ड पॅलेसच्या दुकानांवरही प्राप्‍तिकर अधिकार्‍यांनी कारवाई केली आहे.

भाजप नेते के. पी. नंजुड्डी यांनी मोठ्या प्रमाणात कर चुकवेगिरी केल्याचा प्राप्‍तिकर खात्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यासाठीच कर्नाटक राज्यातील त्यांच्या लक्ष्मी गोल्ड पॅलेस दुकानांवर छापा घालण्यात आल्याची माहिती प्राप्‍तिकर खात्याच्या सूत्रान्वये सांगण्यात आली आहे. नंजुड्डी हे यापूर्वी काँग्रेस पक्षामध्ये  कार्यरत होते. अलीकडेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. 

राज्यात बंगळूरसह विविध ठिकाणी एसीबीची कारवाई

बंगळूर : प्रतिनिधी    

भ्रष्टाचार नियंत्रण दलाने (एसीबी) गुरुवारी सकाळी राज्यातील विविध अधिकार्‍यांच्या घरावर छापे घालून कोट्यवधीची बेहिशोबी मालमत्ता व कायगदपत्रे जप्त केली. एसीबीचे अधिकारी सुब्रमण्यम यांच्या नेतृत्वात महानगर बंगळुरात तीन ठिकाणी छापे घालण्यात आले.

बीबीएमपीचे महसूल अधिकारी नरसिंहलु, कोरमंगलच्या  ईजपूरचे महसूल अधिकारी यांसह बीबीएमपीचे सहाय्यक अभियंता यांच्या निवासस्थानावर छापा घालण्यात आला.बीबीएमपीचे महसूल निरीक्षक  नरसिंहलु हे बोम्मनहळ्ळी बीबीएमपीमध्ये कार्यरत असताना एचएसआर उपनगराजवळील येळ्ळुकुंटे येथील सर्व्हे नं. 2/2 मधील आठ गुंठे जागा खासगी व्यक्तिला विक्री केल्याप्रकरणी त्याना सेवेतून निलंबित करण्यात आले होते, असे समजते. तर दुसरीकडे बीडीएचे उपसंचालक त्यागराज यांच्या निवासस्थानावर व कार्यालयावर एसीबीने छापे घातले. बळ्ळारीच्या एसीबी अधिकार्‍यांनी रायचूर येथे नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक अमरेश यांच्या निवासस्थानावर छापे घातले.विजापूरातील बाराकुट्री तांड्याजवळील पाटबंधारे खात्याचे अधीक्षक  सोमप्पा यांच्या निवासस्थानावर छापे घालण्यात आले. नरगुंद (जि.गदग) येथील ता.पं.चे कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांच्या निवासस्थान व कार्यालयावर, दावणगिरी येथील बेस्कॉनचे सहाय्यक कार्यकारी अभियंता जगदीश्वर यांच्या निवास्थानावर छापे टाकले आहेत.