Sun, Jul 21, 2019 16:13
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › मतदान केंद्रात साप, यंत्रात बिघाड, मतदाराचा मृत्यू

मतदान केंद्रात साप, यंत्रात बिघाड, मतदाराचा मृत्यू

Published On: May 13 2018 2:12AM | Last Updated: May 12 2018 11:04PMबंगळूर ः प्रतिनिधी

राज्यातील विविध ठिकाणी झालेल्या मतदानावेळी अनेक घडामोडी घडल्या. काही ठिकाणी मतदानावर बहिष्कार घालण्यात आला तर काही ठिकाणी नववधूने लग्‍नाआधी मतदानाचा हक्‍क बजावला. बंगळुरातील हेब्बाळ येथील लोट्टेगोल्‍लहळ्ळीत मतदान यंत्र बिघडल्याने तेथे पुनर्मतदानाचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला.

हेब्बाळ येथील लोट्टेगोल्‍लहळ्ळीत मतदान केंद्र क्र.158 मधील खोली क्र. 2 मध्ये मतदान यंत्रात बिघाड निर्माण झाला. तातडीने ते दुरूस्त करणार्‍याला पाचारण केले. मात्र, यंत्र दुपारपर्यंत दुरूस्त होऊ शकले नाही. त्या ठिकाणी एकही मतदान झाले नसल्याने तेथे पुनर्मतदान घेण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी संजीव कुमार यांनी सांगितले. पुनर्मतदानाची तारीख लवकरच निश्‍चित करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

लिंगसुगूरमध्ये बहिष्कार

लिंगसुगूर (जि. रायचूर) येथील कृष्णा नदी परिसरातील कदडदरगड्डीतील मतदारांनी मतदानावर बहिष्कार घातला. त्यांची समजूत घालून मतदानाचे आवाहन करण्यासाठी आलेल्या तहसीलदारांना त्यांनी घेराव घालून आपल्या समस्या सांगितल्या. त्यामुळे केवळ तीन ग्राम पंचायत सदस्यांनी या ठिकाणी मतदान केले. गावातील मुख्य रस्ता सकाळी 9 वाजता बंद करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून नदीवर पूल निर्माणाची मागणी केली जात आहे. मात्र, अजूनही पूल बांधलेला नाही. गावात मूलभूत सुविधा नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली.

लग्‍नाआधी मतदान

मंगळुरातील पच्चनाडी येथील व्हियोला फर्नांडिस या नववधूने लग्‍नापूर्वी मतदानाचा हक्‍क बजावला.  लग्‍नाच्या पोशाखात तिने शहरातील बोंडेल सेंट लॉरेन्स शाळेत मतदान केले. त्यानंतर बेळतंगडी येथे ती लग्‍नासाठी रवाना झाली. दुसर्‍या एका घटनेत बंगळुरातील बनशंकरी दुसर्‍या फेजमधील गर्भवती महिलेला ओळखपत्र नसल्याने मतदान नाकारण्यात आले. बीएनएम महाविद्यालयातील क्र. 142 या मतदान केंद्रात गर्भवती चैत्रा मतदानासाठी गेल्या. मात्र, त्यांनी मूळ मतदान ओळखपत्राऐवजी झेरॉक्स प्रत नेली होती. त्यामुळे त्यांना मतदान नाकारण्यात आले.

पावसामुळे वीज ठप्प

धारवाड जिल्ह्यात विविध ठिकाणी जोरदार पावसामुळे वीजपुरवठा ठप्प झाला. हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघातील दहा मतदान केंद्रांमध्ये विजेअभावी मेणबत्ती, मोबाईलमधील टॉर्चचा वापर करून मतदान कामकाज करण्यात आले.

मतदानानंतर मृत्यू

मंड्या जिल्ह्यातील पांडवपूर वड्डरहळ्ळीतील तिम्मेगौडा (वय 55) यांनी मतदान केले. काही मिनिटांतच त्यांचा मृत्यू झाला. ते काही दिवसांपासून आजारी होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. आजारी असल्याने त्यांना व्हीलचेअरवरून आणण्यात आले. मतदान केल्यानंतर काही क्षणातच त्यांनी मान टाकली. मतदान केंद्राबाहेर आल्यानंतर त्यांचा मृत्यू 
झाला.

वृद्धेचा आत्महत्याचे प्रयत्न

मालमत्तेच्या वादातून लोकप्रतिनिधीविरोधात वृद्धेने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न हावेरीतील देवगिरी येथील मतदान केंद्रासमोर घडला. पार्वतम्मा (वय 60) असे त्या वृद्धेचे नाव आहे. यावेळी उपस्थित पोलिस व इतर अधिकार्‍यांनी त्यांची समजूत घातली.

सापाची केंद्रात हजेरी

मतदानासाठी मतदारांनी गर्दी केलेली असताना अचानक साप आला. बंगळुरातील महादेवपूर मतदारसंघातील 52 क्रमांकाच्या मतदान केंद्रात ही घटना घडली. मतदान केंद्र इमारतीच्या आतून आलेला साप केंद्राबाहेर जात असल्याचे काहींनी पाहिले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर काही काळ केंद्रात गोंधळ निर्माण झाला. 

ट्रकने ठोकरल्याने दोन महिला ठार

प्रवासी वाहतूक रिक्षाला ट्रकने ठोकरल्याने दोन महिला जागीच ठार झाल्या तर दहाजण गंभीर जखमी झाले. हानसमधील बेलूर येथे शनिवारी हा अपघात झाला. सर्व प्रवासी मतदानासाठी जात होते. रामेनहळ्ळीतील शारदम्मा (वय 45)  आणि कमलम्मा (वय 55) अशी मृत महिलांची नावे आहेत. रामेनहळ्ळीतून पंधराजण चिकलूर येथे रिक्षाने मतदानासाठी निघाले होते.

खर्गेंना  घेराव

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा व रस्त्यांची दुरुस्ती करून मुलभूत सुविधा द्या, या मागणीसाठी संतप्त बसवनगर येथील मतदारांनी लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना घेराव  घातला. 

Tags : Karnataka, Election, 2018, Voting,