Wed, Mar 20, 2019 02:58होमपेज › Belgaon › उद्घाटन झाले कामकाजाचे काय?

उद्घाटन झाले कामकाजाचे काय?

Published On: Feb 27 2018 2:05AM | Last Updated: Feb 26 2018 11:41PMनिपाणी : प्रतिनिधी

जिल्हा पालकमंत्री, खासदार आदींच्या  अनुपस्थितीत आ. शशिकला जोल्ले यांनी सोमवारी निपाणी तालुका कार्यालयाचे  उद्घाटन केले असले तरी कामकाजाचे काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. रविवारी तालुका प्रशासनाने लोकप्रतिधींसह प्रसारमाध्यमांना उद्घाटनचे निमंत्रण देत गाजावाजा केला. मात्र मध्यरात्री कार्यालयाला केलेली सजावट तसेच समोर झळकणारा फलकही उतरल्याने सारेच अवाक झाले.

सोमवारी सकाळी 11 वा. आ. जोल्ले यांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या कार्यालयाचे उद्घाटन केल्याने मतदारसंघातील नागरिकांत संभ्रम पसरला आहे.   सोमवारी सकाळी कार्यालय उद्घाटनाचा तालुका प्रशासनाने घाट घातला. त्यानुसार रंगरंगोटी झालेल्या इमारतीवर कार्यालयीन कर्मचार्‍यांनी रविवारी मध्यरात्रीपर्यंत तालुका निपाणी म्हणून फलकही बसवला. शिवाय कार्यालयाला सजावट करत लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यमांना निमंत्रणे पाठविली. मात्र, सोमवारी मध्यरात्री वरिष्ठ पातळीवरून सोमवारी कार्यालयाचे उद्घाटन करता येणार नाही, असा आदेश धाडण्यात आला. त्यामुळे इमारती केलेली सजावट व फलकही उतरविण्यात आला.

दरम्यान, सकाळी 11 वा. आ. जोल्ले यांनी प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यालयातील कर्मचारी किंवा अधिकारी उपस्थित नसताना त्याचे उद्घाटन केले. त्यामुळे सारेचजण संभ्रमात पडले. याबाबत चिकोडीचे मुख्य तहसीलदार चिदबंर कुलकर्णी यांच्यासह निपाणीचे नूतन तहसीलदार संजीव कांबळे यांच्यासह कर्मचार्‍यांशी संपर्क साधला. पण या दोन्ही अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी आपले मोबाईल बंद ठेवले होते.

वास्तविक तालुका घोषणेनंतर तहसीलसाठी केवळ तारखेची औपचारिकता उरली होती. त्यामुळे तालुका कार्यालयाचे उद्घाटन व प्रत्यक्ष कामकाजाला सुरूवात कधी होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. याबाबत दै.पुढारीने दि.23 रोजीच्या अंकात निपाणी तहसीलला उद्घाटनची प्रतीक्षा अशा आशयाचे वृत्त प्रसिध्द केले होते. अखेर सोमवारी निपाणी तालुक्याच्या कामकाजाला सुरूवात होणार असल्याने नागरिकांत समाधान पसरले. पण उद्घाटनला पालकमंत्र्यांसह कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी अनुपस्थितीत  होते. त्यामुळे उद्घाटन झाले असले तरी कामकाजाचे काय, प्रश्‍न मात्र अनुत्तरितच राहिला असून अधिकृतरित्या तहसील कार्यालयाचे उद्घाटन मात्र पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे.