Thu, Jul 18, 2019 02:28होमपेज › Belgaon › पश्‍चिम भागात आधुनिक शेतीवर भर 

पश्‍चिम भागात आधुनिक शेतीवर भर 

Published On: Jun 03 2018 1:12AM | Last Updated: Jun 02 2018 8:37PMबेळगाव : प्रतिनिधी

तालुक्याच्या पश्‍चिम भागातील शेतकर्‍यांनी आधुनिक शेती पद्धतीवर भर दिला आहे. नांगरणीसाठी त्यांच्याकडून पॉवर टिलर व ट्रॅक्टरचा वापर केला जात आहे. सध्या मशागत काम अंतिम टप्प्यात आले आहे. 

तालुक्यात बरेच शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करणे पसंत करतात. शेती यंत्रे भाडेतत्त्वावर घेणे, भाडे महागडे असले तरी वाढीव मोलमजुरीच्या तुलनेत ते फायद्याचे आहे. शिवाय आज मजूरही सहजपणे उपलब्ध होत नाहीत. शेतजमिनी नांगरण्यासाठी पावर टिलर, मळणीसाठी ट्रॅक्टर आदी उपयोग किफायतशीर व वेळेची बचत करणारा ठरल्याचा अनुभव शेतकर्‍यांना आला आहे.  पश्‍चिम भागातील बेनकनहळ्ळी, उचगाव, कल्लेहोळ, बेकीनकेरे,  बेळगुंदी, सोनोली, यळेबैल, राकसकोप, बिजगर्णी, कावळेवाडी, बेळवट्टी, बडस, किणये, कर्ले आदी भागात नांगरणीसाठी शेतकरी पॉवर टिलर, ट्रॅक्टर, भात कापणी-मळणीसाठी यंत्र वापरताना दिसत आहेत.

ट्रॅक्टर व पॉवर टिलरच्या साहाय्याने मशागत, गवत कापणी, भात रोप कापणी व मळणीसाठी यंत्राचा वापर केला जातो. भात रोप लागवड करताना पॉवर टिलरचा चिखल करण्यासाठी उपयोग करण्यात येतो. शेत नांगरणीसाठी टिलर, ट्रॅक्टर  विकत घेणे एका शेतकर्‍याला परवडणारे नाही. म्हणून सामूहिक पद्धतीने शेती करणे तसेच गट स्थापन करून यंत्रे विकत घेणे या पर्यायाची निवड शेतकरी करू शकतात.

शेतीत कटिकनाशक व जलसिंचन व्यवस्थापन आदी बाबी योग्य पद्धतीने केल्यास ज्या शेतकर्‍यांनी चालू खरीप हंगाम व तंत्रपद्धत वापरून भातशेती केली त्यांना समाधानकारक पीक मिळते. सध्या मशागतीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून धुळवाफ पेरणीनेही जोर पकडला आहे. चार-पाच वर्षापासून शेतकर्‍यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्यावर भर दिल्याने विशेषत: बैलजोडीचा वापर कमी होतो आहे.