Wed, May 22, 2019 14:41होमपेज › Belgaon › किणेकर यांच्या भूमिकेने कार्यकर्ते संभ्रमात

किणेकर यांच्या भूमिकेने कार्यकर्ते संभ्रमात

Published On: May 23 2018 1:07AM | Last Updated: May 22 2018 8:47PMबेळगाव : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारत ता. म. ए. समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. यामुळे आधीच सैरभैर बनलेले कार्यकर्ते संभ्रमावस्थेत सापडले आहेत. तालुक्यात म. ए. समितीला नव्याने उभारी देण्यासाठी किणेकर यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी होत आहे.किणेकर यांचा विधानसभेत दारुण पराभव झाला. यामुळे ते निराश झाले आहेत. त्यांना पराभव नवीन नाहीत. मात्र म. ए. समितीच्या मतामध्ये झालेली घट ही स्वकीयांनी केलेल्या द्रोहामुळे झाल्याचा त्यांचा समज आहे.  ज्या मराठी भाषिकासाठी आपण लढे दिले. सातत्याने रस्त्यावर उतरून संघर्ष केला. त्याच मराठी भाषिकांनी राष्ट्रीय पक्षांना साथ दिली. याची सल त्यांना लागून राहिली आहे.

रविवारी झालेल्या ता. म. ए. समितीच्या बैठकीत त्यांनी आपली व्यथा कार्यकर्त्यासमोर मांडली. आजवरच्या राजकीय जीवनात अनेक संघर्ष केले. यशापयश पचविले. तीन विधानसभा निवडणुकीचे पराभव स्वीकारले. परंतु यामध्ये सर्वाधिक दुःख नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमुळे झाले.  विरोधक हे आपले उघड शत्रू आहेत. मात्र स्वकीयांनी केलेल्या विश्‍वासघातामुळे 80 टक्के मतदारांनी आपल्या विरोधात मतदान केले आहे. हा प्रकार धक्‍कादायक असून आपले नेतृत्व 80 टक्के समाजाला मान्य नाही. यामुळे केवळ पदाच्या खुर्च्या सांभाळण्यात आपल्याला स्वारस्य नसल्याचे  त्यांनी सांगितले.

किणेकर यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ता. म. ए. समितीला सावरण्याचे काम केले. कार्यकर्त्यांना संघटित केले. मरगळलेल्या मराठी मनात स्वाभिमानाची  ज्योत प्रज्वल्लित ठेवण्याचे काम केले. संघटनेत नव्या कार्यकर्त्यांची फौज तयार करण्यासाठी महिला व युवा आघाडी कार्यरत केली. यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. हा सारा खटाटोप करूनदेखील मराठी मतदारांनी राष्ट्रीय पक्षांच्या पारड्यात टाकलेल्या मतांच्या संख्येमुळे ते व्यथित झाले आहेत. परिणामी राजीनाम्याचा निर्णय त्यांनी घेतला. हा प्रकार तालुक्यातील कार्यकर्त्यांसाठी धक्‍कादायक स्वरुपाचा आहे.सीमाप्रश्नाचा खटला अंतिम टप्प्यात आहे. अशा निर्णायक क्षणी राजीनामा स्वीकारल्यास म. ए. समितीच्या कामकाजात शिथिलता येण्याची शक्यता आहे. अपयशाने खचलेल्या कार्यकर्त्यांना आधाराची आवश्यकता आहे. यामुळे कार्यकर्त्यातून किणेकर यांनी आपला राजीनामा तात्काळ मागे घ्यावा अशी जोरदार मागणी होत आहे.

चेंडू एन.डी. पाटील यांच्या कोर्टात

किणेकरांनी दिलेल्या राजीनाम्याचा स्वीकार ता. म. ए. समितीने अद्याप केलेला नाही. सार्‍याच कार्यकर्त्यांनी राजीनामा स्वीकारण्यात येवू नये अशी मागणी केली आहे. परंतु, राजीनाम्याबाबत अंतिम निर्णय प्रा. एन. डी. पाटील हे घेणार आहेत. त्याबाबत कोल्हापूर येथे कार्यकर्त्यांकडून प्रा. एन. डी. पाटील यांची भेट घेण्यात येणार आहे.