Wed, Apr 24, 2019 07:35होमपेज › Belgaon › चिकोडीत भुयारी गटार काम प्रगतीपथावर

चिकोडीत भुयारी गटार काम प्रगतीपथावर

Published On: Jun 05 2018 1:16AM | Last Updated: Jun 04 2018 10:29PMचिकोडी : प्रतिनिधी 

शहराच्या पुढील 30 वर्षांच्या लोकसंख्येचा विचार करुन भुयारी गटार (युजीडी)  योजनेंतर्गत सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याबरोबर सांडपाणी शुध्दीकरण करुन पुन्हा शेतीसाठी वापरण्यायोग्य बनविण्याची पर्यावरणपूरक योजना राबविली जात आहे.  

शहरात फेब्रुवारी 2016 पासून राज्य शासनाच्या  80 कोटी 14 लाख 75 हजार निधीतून आ. गणेश हुक्केरींच्या प्रयत्नातून भुयारी गटार (युजीडी) योजनेचे काम सुरु आहे. या योजनेंतर्गत शहरात 94 कि.मी.पर्यंत भुयारी गटारीचे बांधकाम घेण्यात आले असून सध्या 24.5 किमीपर्यंतचे काम पूर्ण तर आणखी 70 किमीपर्यंतचे काम शिल्लक आहे.  प्रारंभी 42 कोटी 37 लाख 27 हजार रू. निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकूण 80 कोटी 14 लाख 75 हजाराचा नवा आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार आ. गणेश हुक्केरी यांनी आवश्यक अतिरिक्त 37.77 कोटी निधी मंजूर करुन आणला आहे.

पर्यावरणपूरक योजना  

या योजनेंतर्गत शहरात आवश्यक पाईप बसविण्यासह चेंबरची निर्मिती करण्यात येत आहे. या पाईपला कनेक्शन देऊन सांडपाणी सोडता येणार आहे. सदर पाणी भुयारी गटारीमार्फत कोणत्याही नाल्याला न सोडता थेट हिरेकुडी रस्त्यावर बांधण्यात आलेल्या वेटवेल टँक व पंपहाऊसमध्ये जाते. तेथून सर्व सांडपाणी टांग्यानकोडी येथे बांधलेल्या शुध्दीकरण केंद्रात पाणी पाठविले जाते. तेथे तलावाच्या स्वरुपात  पाणी साठवून टप्प्याटप्प्याने पाणी शुध्दीकरण प्रक्रिया करत शेतीसाठी वापरण्यायोग्य बनवले जातेे. त्यानंतर सदर पाणी शेजारच्या नाल्यात सोडले जाते. अशाप्रकारची  बेळगाव जिल्ह्यातील पहिलीच पर्यावरणपूरक ड्रेनेज योजना आहे.

भुयारी गटार योजनेच्या लाभार्थीना महिन्याला 15 रुपये  डोमेस्टिक कनेक्शनला, नॉन डोमेस्टिक 30 रुपये, कमर्शियल कनेक्शनला 60 रुपये बिल आकारले जाणार असून पाणीपट्टीसोबत भरावे लागणार आहे. 

शहरात राबविण्यात येत असलेल्या भुयारी गटारीला घरात सेफ्टी टँक नसले तरी थेट कनेक्शन घेता येणार आहे. त्यामुळे नव्या शौचालयांची निर्मिती करताना सेफ्टीटँक बांधण्याची गरज नाही. त्यामुळे सेफ्टीटँकसाठी येणारा 25 ते 30  खर्च येणार नाही. त्यामुळे थेट कनेक्शन देण्याचे आवाहन सहाय्क कार्यकारी अभियंता एस. बी. बनकर यांनी केले आहे.