Tue, Mar 19, 2019 16:16होमपेज › Belgaon › ‘अथणी’त धोकायदाक विहिरी, बोअर उघड्या

‘अथणी’त धोकायदाक विहिरी, बोअर उघड्या

Published On: Jul 26 2018 1:31AM | Last Updated: Jul 25 2018 11:34PMसंबरगी :प्रतिनिधी

अथणी उत्तर भागात शाळेच्या आवारात उघड्या विहिरी व बोअर असल्याचे निदर्शनास येत आहे. अपघात घडला तर याला जबाबदार कोण, असा प्रश्‍न जनता करीत आहे.
2007 मध्ये अथणी उत्तर भागातील विद्यार्थी गणेशमूर्ती स्थापन करून गावास जात होते. रस्त्याकडेला असलेल्या पार्थनहळ्ळी गावाजवळ विहिरीत बस कोसळून तीन विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले होते.

त्यावेळी सरकारने रस्त्याकडेला असलेल्या निरुपयोगी विहिरी मुजवा किंवा संरक्षक भिंत बांधा असा आदेश दिला होता. आदेशाप्रमाणे तेवढ्यापुरता सर्व्हे करून विहिरी, कूपनलिका मुजविल्या. परंतु ग्रामीण भागात बर्‍याच गावात खुल्या विहिरी गावाच्या मध्यवर्ती गर्दीच्या ठिकाणी आहेत. गावातल्या राजकारणामुळे सर्व काही विसरून सरकारचा आदेश धाब्यावर बसविण्यात आला आहे.

तीन वर्षापूर्वी झुंजरवाड सुटट्टी येथे कूपनलिकेत बालिका पडून मरण पावली. तिला वाचविण्यासाठी जिल्हा शासकीय यंत्रणेने 48 तास प्रयत्न करूनही उपयोग झाला नाही. असे असताना अथणी उत्तर भागातील जंबगी, संबरगी, शिरूर, खिळेगावात उघड्या विहिरीवर जाळ्या नाहीत. जंबगी-अथणी रस्त्याच्या वळणावर विहीर आहे. तेवरट्टी-शिवनूर रस्ता वळणावर रस्त्याकडेला उघड्या विहिरी आहेत. पावसाळ्यात विहिरी भरल्यानंतर रस्ता की पाणी हे समजत नाही. त्यामुळे दुर्घटना घडतात.

अधिकार्‍यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे विहिरी खुल्याच आहेत. काही ठिकाणी तर शाळेच्या समोरच अशा विहिरी आहेत. मुले खेळताना बाहेर जाऊन डोकावून विहिरीत पाहू लागल्यास बुडण्यासारखे अपघात होण्याची शक्यता आहे. 

हा धोका टाळण्यासाठी उघड्या विहिरींभोवती कुंपण घातल्यास नुकसान होणार नाही.