Thu, Jan 17, 2019 04:41होमपेज › Belgaon › परीक्षा अंतिम टप्प्यात, समर कॅम्प उदंड

परीक्षा अंतिम टप्प्यात, समर कॅम्प उदंड

Published On: Mar 14 2018 12:52AM | Last Updated: Mar 13 2018 11:19PMबेळगाव : प्रतिनिधी

दिवस सुगीचे सुरु जाहले..
ओला चारा बैल माजले..
शेतकरी मन प्रफुल्ल झाले..

या बालकवितेतील ओळींप्रमाणे सध्या समर कॅम्पचा मोसम सुरू होत आहे. शालेय परीक्षा शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे बेळगाव शहर आणि जिल्ह्यात उन्हाळी शिबिरांची सुगी येणार आहे. यापैकी काही शिबीरे सशुल्क आहेत, तर काही पूर्णपणे मोफत. विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा सुरू झाल्या म्हणजे सुट्टीतला बेत म्हणून मामाच्या गावाचे वेध लागत. परंतु, काळाच्या ओघात मामाचा गाव हरवला आणिा सुटीचा सदुपयोग करण्यासाठी विद्यार्थी, पालकांना उन्हाळी शिबिरांची सवय लागली.  सध्या शालेय परीक्षांना सुरू झाल्या असून यामुळे आयोजक सक्रिय झाले आहेत.

लहानपण म्हणजे मौजमजा, मस्ती, अल्लडपणा, खेळ, दंगा, नातेवाईकांचा पाहुणचार, यात्रा-जत्रा यांची रेलचेल यांनी भरून गेलेले असायचे . मात्र गेल्या दहा वर्षांत प्रत्येक पालकाला आपल्या मुलाला सर्वज्ञानी तसेच अष्टकला आणि चौसष्टविद्यापारंगत बनवण्याची घाई झाली आहे. इतकी की मुलगा किंवा मुलगी दिवसभर कुठल्या ना कुठल्या कॅम्पमध्ये अथवा क्‍लासमध्ये गुंतलेला असतो. त्याचाच परिणाम म्हणून गल्लीबोळात समर कॅम्प आयोजित करण्यात येत आहेत. 

येत्या काळात सुट्टीचा हंगाम सुरू होणार आहे. त्याकाळात 15 दिवस ते महिनाभराचे कॅम्प आयोजित केले जातात. त्यासाठी संयोजकांनी आतापासूनच तयारी चालविली आहे.शिबिरार्थीना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. मार्च महिन्याच्या अखेरीला असे कॅम्प गजबजणार आहेत.