होमपेज › Belgaon › सर्वंकष विचारांती प्रभाग पुनर्रचना निर्णय घ्या

सर्वंकष विचारांती प्रभाग पुनर्रचना निर्णय घ्या

Published On: Feb 27 2018 2:05AM | Last Updated: Feb 26 2018 11:53PMबेळगाव : प्रतिनिधी

गतवेळी झालेल्या प्रभाग पुनर्रचनेमुळे मोठ्या प्रभागांच्या विकासावर परिणाम झाला आहे. त्यामुळे यावेळच्या प्रभाग पुनर्रचनेसंदर्भात लोकसंख्या, भौगोलिक संलग्नता, नागरीक आणि लोकप्रतिनिधींच्या सूचना जाणून घेवून नव्या प्रभाग पुनर्रचनेचा निर्णय घेण्यात यावा, असा निर्णय मनपाच्या सोमवारच्या सर्वसाधारण बैठकीत घेण्यात आला. नव्या प्रभाग पुनर्रचनेबाबत नगरविकास खात्याला प्रस्ताव पाठविणार असल्याचेही महापौर संज्योत बांदेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

सोमवारी सायंकाळी झालेल्या सर्वसाधारण बैठकीत प्रभाग पुनर्रचनेबाबत झालेल्या चर्चेवेळी सत्ताधारी गटनेते पंढरी परब तसेच किरण सायनाक यांनी प्रभाग पुनर्रचनेबाबत मागीलवेळी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होवू नये, काही प्रभाग आकाराने मोठे आहेत. त्या प्रभागांमध्ये विकासाची कामे राबविताना निधी कमी पडत आहे, त्याचा विचार करून नगरविकास खात्याने प्रभाग पुनर्रचनेबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशा सूचना मांडल्या आहेत. या सूचनेला महापौर बांदेकर यांच्यासह सभागृहाने मान्यता दिली. त्यामुळे लवकरच मनपाच्यावतीने नगरविकास खात्याकडे नव्या प्रभाग पुनर्रचनेबाबत प्रस्ताव पाठविला जाणार आहे.

बांधकाम परवान्यावरून तू तू मैं मैं

बैठकीत मनपा सभागृहात नव्या बांधकाम परवान्यासंदर्भात निर्णय झाला आहे. त्याची अंमलबजावणी केली जावी, अशी सूचना पंढरी परब यांनी केली. त्यावेळी आ. फिरोज सेठ यांनी नविन बांधकाम परवान्याबाबत योग्य ती माहिती घेवूनच नव्या बांधकाम नियमावलीला मंजुरी देण्यात यावी, अशी भूमिका घेतली. यावेळी हुबळी-धारवाड मनपाने बांधकाम परवाना आणि नियमावलींबाबत घेतलेल्या निर्णयावरून आ. सेठ आणि परब यांच्यामध्ये मतभेद दिसून आले. 

सभेतील चर्चा आणि निर्णयावर संभ्रम

1 मार्च रोजी महापौर-उपमहापौर निवडणूक होत आहे. त्यामुळे आजच्या सर्वसाधारण बैठकीत इतिवृत्त वाचनाला मंजुरी देण्याचे ठरविण्यात आले होते. 

मात्र इतिवृत्त वाचनामध्ये अनेक विषयांवर निर्णय घेणे आवश्यक होते. त्यामुळे आचारसंहिता काळात सभागृहात चर्चा करून निर्णय घेणे कितपत योग्य याबाबत सदस्यांमध्ये संभ्रम दिसून आला. पंढरी परब यांनी यासंदर्भात मनपा कायदे सल्लागारांना माहिती देण्याची सूचना केली. कायदे सल्लागार अ‍ॅड. महंतशेट्टी यांनी सर्वसाधारण बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेता येणार नाहीत, असे स्पष्ट केल्यामुळे आजची बैठक नाममात्र ठरणार असेच स्पष्ट झाले.