होमपेज › Belgaon › डिजीटल युगात पशु-पक्षी धोक्यात

डिजीटल युगात पशु-पक्षी धोक्यात

Published On: Jun 02 2018 2:00AM | Last Updated: Jun 01 2018 7:50PMबेळगाव : प्रतिनिधी

आजच्या डिजीटल युगात सिमेंटची जंगले फोफावत आहेत. परिणामी पशु-पक्ष्यांचा निवारा संकटात आला आहे. विविध जागतिक दिन केवळ नावापुरतेच आहेत का? असा प्रश्‍न पडावा. ते शोपुरतेच साजरे करण्यापेक्षा वन्य जीवांच्या चारा-पाण्याची सोय करणे, पर्यावरण संतुलनासाठी अत्यंत गरजेचे आहे. 

वाढत्या सिमेंटच्या जंगलांनी निर्सगावर आक्रमण केल्याने गावशिवारे आणि झाडेही कमी होऊ लागली आहेत. वाढत चाललेले उन्हाचे चटके, निष्पर्ण होत असलेली झाडे, झुडुपे, दुर्मीळ होत असलेले पाणीसाठे यामुळे मुक्या वन्य प्राण्याना जगविण्यासाठी  कसरत करावी लागत आहे. 

जागतिक दिन आला म्हणजे पक्ष्यांच्या किलबिलाटाप्रमाणे सोशल मीडियावरदेखील संदेशांची किलबिलाट सुरू होते. ‘पक्ष्यांसाठी घराबाहेर पाणी ठेवा’ असे संदेश सोशल मीडियावर फिरू लागतात. पण संदेश पाठविणाराच पक्ष्यांसाठी पाणी ठेवत नाही, ही शोकांतिका आहे. यामुळे पशु-पक्षी कमी होऊ लागले आहेत. प्रत्येकाने जबाबदारी ओळखून चारा पाण्याची सोय करणे गरजेचे आहे.  

आपल्या सुखसुविधा वाढविण्यासाठी मानवाने मोबाईल, यांत्रिक वाहने, सिमेंटची जंगले आदींना मोठे स्थान देऊन निर्सगाचे नुकसान चालवले आहे. यात वृक्षतोड होऊन पशु-पक्ष्यांची मोठी जीवितहानी झाली. याचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. 

शासनाने ठरवून दिलेला चिमणी दिन, पर्यावरण दिन, जलदिनसह अनेक दिनाला अनेक सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये आदींचा भरभरून प्रतिसाद मिळतो. यामध्ये पक्ष्यांना धान्य, पाणी देऊन हे दिन साजरे करण्यात येतात. एक दिवस जागृती किंवा हे दिन साजरे केल्याने पशु-पक्षी बचावणार नाहीत. त्यासाठी समाजजागृती होऊन प्रत्येकानेच पुढाकार घ्यायला हवा. 

उन्हाच्या चटक्याने वन्य जीव, पशु-पक्ष्यांना भटकंती करावी लागत आहे. वन्यजीवांचे जतन व संवर्धन व्हावे, यासाठी शासनाबरोबर सर्वांनी पुढाकार घ्यावा. पूर्वी शेकडो पक्षी, झाडे पाहावयास मिळायची. पक्ष्यांच्या किलबिलाटाने प्रसन्न वाटायचे. मात्र, परिस्थिती उलट झाली आहे. ग्रामीण भागात विहिरी, झाडे, अडगळीच्या खोल्या आदीमध्ये सुगरणीने घरकाम केलेली घरटी आढळून येतात. मात्र, ही विणकाम केलेली घरटी पक्ष्यांविना रिकामी आहेत.