Thu, Aug 22, 2019 08:11होमपेज › Belgaon › पहाटेच्या शांततेत गावठी दारूचा काळाबाजार

पहाटेच्या शांततेत गावठी दारूचा काळाबाजार

Published On: Dec 10 2017 1:18AM | Last Updated: Dec 09 2017 10:19PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

काही वर्षांपूवी बेळगाव जिल्ह्यात गोवा आणि हुबळी मेड दारुने धुमाकूळ घातला होता. अद्यापही काही प्रमाणात या दारूचा प्रभाव आहे. मात्र, कित्येक वर्षांपासून सुरु असलेल्या हातभट्ट्यांमधून आजही दारु गाळली जाते. अबकारी आणि खाकीला चकमा देत गावठी रतीब सुरुच आहे. पहाटेच्या शांत वातावरणात दुचाकीच्या आवाजावर चालणारा गावठी दारूचा काळाबाजार सर्वसामान्यांच्या कल्पनेपलीकडील आहे.

काकती, होनगा, मुत्यानट्टी, हुल्यानूर, सोनट्टी, ब्युड्रानूर, कारावी, हुन्सेवारी, कणबर्गी, यमनापूर, भुतरामहट्टी भागात गेल्या कित्येक वर्षांपासून खुलेआम गावठी दारू  विक्री होत आहे. गावठी दारूसाठी शेजारच्या गावाबरोबरच शहर भागातील तळीरामांची नियमित त्या भागाला हजेरी असते. या भागात ये-जा करणार्‍या परिवहन मंडळाच्या बसेसमध्ये तळीराम प्रवाशांची वर्दळ असते.

शहरापासून 15 ते 20 किमी अंतरावर असलेल्या जंगल भागात गावठी दारू गाळण्याचा अवैध धंदा कित्येक वर्षांपासून सुरु आहे.जंगलातील लाकडे, तळ्याचे पाणी आणि ड्रममध्ये गाळली जाणारी दारु असे रसायन गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु आहे. केवळ तळागाळातील नसून काही उच्चभ्रूंनाही गावठी दारूची चव हवी असते. तालुक्यातील अनेक गावांबरोबरच शहरातही नियमितपणे गावठी दारूची विक्री सुरू असते.

ग्रामीण आणि शहरी भागात गावठी दारू पोहोचविण्याचे काम ठराविक जणांना दिले जाते. पूर्वी सायकलवरुन नेण्यात येणारे गावठी दारूचे फुगे आता दुचाकीवरुन जात आहेत. दिवसा रस्त्यांवर रहदारी असते. त्यामुळे वासाने दारुचा सुगावा लागू शकतो याची पुरेपूर खबरदारी घेत पहाटेच्या वेळी दारूची वाहतूक सुरु असते. शहरातील गांधीनगर, महाव्दार रोड, कामत गल्ली, कपिलेश्‍वर रेल्वेलाईन तसेच ग्रामीण भागातही नियमित गावठी दारूची विक्री होते. गावठी दारुने आतापर्यंत अनेकांचे बळी गेले आहेत. मात्र, याची वाच्यता होत नाही. त्यामुळे पोलिस गावठी दारू विक्रीकडे दुर्लक्ष करतात. तसेच अबकारी खात्याच्या कार्यक्षमतेवरही प्रश्‍नचिन्ह उभे आहे. गावठी दारू विक्री धंद्यातील मसल पॉवरमुळे त्याविरोधात बोलण्यास कोणी धजावत नाही.