Sun, Aug 25, 2019 12:54होमपेज › Belgaon › ‘बेळगाव दक्षिण’वर दिग्विजय कोण मिळवणार?

‘बेळगाव दक्षिण’वर दिग्विजय कोण मिळवणार?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव शहरासह काही गावांचा समावेश असलेल्या दक्षिण मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. मराठी भाषिक मतदारांची सर्वाधिक संख्या असणार्‍या मतदारसंघात म. ए. समितीसह भाजप, काँग्रेस यांनी कसरत चालविली आहे. यामुळे हा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत आहे.

सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व म. ए. समितीचे आ. संभाजी पाटील करत आहेत. समितीच्या ताब्यात असणारा मतदारसंघ हिसकावून घेण्यासाठी भाजप व काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. 

शहरातील निम्मा भाग बेळगाव दक्षिणमध्ये येतो. त्याचबरोबर अनगोळ, वडगाव, शहापूर,खासबाग, टिळकवाडी, भाग्यनगर या उपनगरांचाही समावेश आहे.  वडगाव, शहापूर, खासबाग, जुने बेळगाव ही शहरी मतदारांची मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. तालुक्यातील येळ्ळूर, धामणे, पिरनवाडी आणि मच्छे या चार मोठ्या ग्रा. पं. चा समावेश मतदारसंघात आहेत. या चारही ग्रा. पं. व्याप्तीत मराठी बहुभाषिक आहेत. तर खासबाग, वडगाव परिसरात विणकर समाजाची मते अधिक संख्येने आहेत.

इच्छुकांची संख्या अधिक : दक्षिण मतदारसंघात सर्वच पक्षांकडून इच्छुकांची संख्या अधिक आहे. म. ए. समितीने शरद पवार यांच्या सभेच्या निमिताने हा भाग पिंजून काढला आहे. 

समिती : समितीकडून आ. संभाजी पाटील, स्वतः मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, खजिनदार प्रकाश मरगाळे, उद्योजक राजेंद्र मुतगेकर, माजी एपीएमसी अध्यक्ष मनोहर होसूरकर, माजी महापौर किरण सायनाक, सरिता पाटील, नगरसेवक अ‍ॅड. रतन मासेकर, आदींचा समावेश आहे. 

भाजप : भाजपतर्फे माजी आ. अभय पाटील, महानगर उपाध्यक्ष पांडुरंग धोत्रे, सचिव सुनिल चौगुले, तेजस्विनी धाकलूचे, नगरसेवक दीपक जमखंडी हेही शर्यतीत आहेत. ब्राम्हण समाजाने नुकतीच पत्रकारपरिषद घेवून भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे चुरस वाढली आहे.

काँग्रेस : काँग्रेसमध्येही इच्छुकांची संख्या अधिक आहे. विणकर समाजाचे नेते विधानपरिषद सदस्य एम. डी. लक्ष्मीनारायण यांनी मतदारसंघातच ठाण मांडले आहे. त्याचबरोबर जि. पं. सदस्य रमेश गोरल, जयराज हलगेकर, राजेश जाधव, शंकर मुनवळ्ळी आदीसह  नऊ जणांनी उमेदवारीसाठी प्रयत्न चालविले  आहेत.राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार कोणीही असले तरी विद्यमान आमदार समितीचा असल्यामुळे लढत समिती विरुद्ध राष्ट्रीय पक्ष अशीच होण्याची शक्यता आहे. 

मतदारसंघ असा 

एकूण लोकसंख्या...2, 98, 491
एकूण मतदार ......2, 27, 501
पुरुष मतदार ........1, 15, 001
महिला मतदार......1, 12, 433
तृतीयपंथी............. 67

विस्तार
टिळकवाडी, हिंदवाडी, वडगाव, शहापूर, खासबाग, जुने बेळगाव, येळ्ळूर, धामणे, पिरनवाडी, मच्छे.

समितीच्या भूमिकेकडे लक्ष

आ. संभाजी पाटील यांनी निवडणुकीबाबत आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. मध्यवर्ती म. ए. समितीची मंगळवारी बैठक होणार आहे. त्यानंतर शहर समितीच्या माध्यमातून उमेदवार निवडीची हालचाल सुरू होणार आहे. समितीच्या हालचालीकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागून आहे. 


  •