Wed, Nov 21, 2018 17:27होमपेज › Belgaon › घुबड तस्करीतील आणखी चौघे ताब्यात

घुबड तस्करीतील आणखी चौघे ताब्यात

Published On: Jun 15 2018 1:04AM | Last Updated: Jun 15 2018 12:02AMसंकेश्‍वर : प्रतिनिधी

निपाणी आणि हुक्केरी तालुक्यात घुबड तस्करी प्रकरणी रायबागचे वन अधिकारी शिवानंद नायकवाडी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बुधवारी पहाटे 5 वाजता कारवाई करुन चौघा संशयितांना ताब्यात घेतलेे. यामध्ये गडहिंग्लज तालुक्यातील दोन, हुक्केरी तालुक्यातील एक आणि निपाणी तालुक्यातील एकाचा समावेश आहे. तस्करीचे कनेक्शन केरळ, गोव्यापर्यंत आहे.

आप्पासाहेब अशोक गायकवाड (गडहिंग्लज), सोहन अशफाक द्राक्षी (भडगाव, ता. गडहिंग्लज), संजय बाळू दिवेकर (बुगटेआलूर, ता. हुक्केरी), मनोहर दादू खामकर (यरनाळ, ता. निपाणी) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. या चौघांना येथील न्यायालयात हजर करुन  न्यायालयीन कोठडीसाठी पंधरा दिवस हुक्केरी येथील उपकारागृहात रवानगी करण्यात आली. आणखी काही संशयितांची नावे हाती लागली असल्याचे समजते.

यामध्ये मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय वनविभागाने व्यक्‍त केला आहे. केरळमध्ये तस्करी करणार्‍या एका व्यापार्‍याचे नावही त्यांना मिळाले आहे.ही कारवाई रायबागचे वन अधिकारी शिवानंद नायकवाडी, एस. बी. गणाचारी, जी. आर.  सर्रीकर, प्रभू तंगडी यांच्या पथकाने बुधवारी केली. बुगटे आलूर येथून संजय बाळू दिवेकरला ताब्यात घेतले.  गडहिंग्लज, भडगाव आणि यरनाळ (ता. निपाणी) येथून बाकीच्या संशयितांना ताब्यात घेतले.

या कारवाईतील सोहन द्राक्षी हा कोंबडीचे मांस रोज दोन किलो असे त्यांना पुरवत असे. तस्करीतील सर्व घुबड नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथे प्रमोद मोकाशी यांच्या शेतीवाडीतील घरामध्ये ठेवण्यात येत असत. तेथे कोणाचाही वावर नसे. यामुळे तस्करांनी याची निवड केली होती.या कारवाईत आणखी काहींची नावे वन विभागाच्या हाती लागली आहेत. त्यांच्यावर कारवाईसाठी स्वतंत्र पथकाची निर्मिती केल्याची वन अधिकार्‍यांनी सांगितले.