Wed, Jul 17, 2019 00:33होमपेज › Belgaon › 2019 साली मीच पंतप्रधान : राहुल 

2019 साली मीच पंतप्रधान : राहुल 

Published On: May 09 2018 1:50AM | Last Updated: May 09 2018 12:38AMबंगळूर : वृत्तसंस्था

भाजप नेहमी प्रामाणिकपणा आणि सभ्यतेबद्दल बोलत असतो. मात्र, भाजपचे नेते भ्रष्टाचाराच्या आरोपात बरबटले आहेत, असा जोरदार प्रहार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. त्याचबरोबर राहुल यांनी आपण 2019 मध्ये देशाच्या पंतप्रधानपदासाठी इच्छुक असल्याचे प्रथमच मान्य केले. दरम्यान, भाजपने राहुल यांची खिल्‍ली उडविली आहे. आधी कर्नाटक जिंका मग दिवास्वप्न बघा, अशा शब्दांत भाजप प्रवक्‍ता शहानवाज हुसेन यांनी पलटवार केला आहे.कर्नाटक विधानसभा निवडणुकीवरून सध्या जोरदार कलगीतुरा रंगला असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला, तर तुम्ही पंतप्रधान होणार का, असा प्रश्‍न विचारला असता, राहुल गांधींनी उत्तर दिले.राहुल गांधी यांनी अमित शहा यांच्यावर हल्ला चढविला.

भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कडून प्रत्येक संस्था आपल्या ताब्यात घेण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात असून, काँग्रेसने त्यांचे मनसुबे उधळले आहेत, असे राहुल गांधी म्हणाले. भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या येडियुराप्पांसारख्या व्यक्‍तीला मुख्यमंत्रिपदाचे तिकीट का दिले?, नरेंद्र मोदींना स्वच्छ प्रतिमा असलेला उमेदवार का मिळाला नाही? याचे उत्तर त्यांनी स्वतः द्यावे. तसेच रेड्डी ब्रदर्सना तिकिटे का देण्यात आली?, हजार कोटींचा आर्थिक घोटाळा करत त्यांनी सर्वसामान्यांचे पैसे लाटले असताना उमेदवारी कशासाठी? असे सवाल राहुल गांधींनी विचारले.

नरेंद्र मोदींनी दरवर्षी 2 कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्‍वासन दिले होते; पण मग ते का झाले नाही याचे स्पष्टीकरण त्यांनी तरुणांना दिले पाहिजे, अशी मागणी राहुल गांधींनी केली. यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करत जर काँग्रेस शेतकर्‍यांना कर्जमाफी देऊ शकते, तर मग मोदी सरकार ते का देऊ शकत नाही? असा रोखठोक प्रश्‍नही  विचारला. दरम्यान, राहुल यांची खिल्‍ली उडविताना हुसेन म्हणाले, राहुल उपाध्यक्ष झाल्यावर 13 राज्यांत आणि अध्यक्ष झाल्यावर 5 राज्यांत काँग्रेसचा  पराभव झाला. पंतप्रधानपदाची स्वप्ने बघण्यापेक्षा त्यांनी प्रथम राज्यांत विजय मिळवून दाखवावा. मित्रपक्षही त्यांना पंतप्रधान म्हणून स्वीकारत नाहीत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.