होमपेज › Belgaon › ...तर राजीनामा देईन : मुख्यमंत्री

...तर राजीनामा देईन : मुख्यमंत्री

Published On: May 28 2018 1:46AM | Last Updated: May 28 2018 12:14AMबंगळूर ः प्रतिनिधी

शेतकर्‍यांची कर्जमाफी शक्य झाली नाही तर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी रविवारी केली. भाजपसह विरोधकांनी कृषी कर्जमाफीवरून उद्यापासून (सोमवार) राज्यात बंदची हाक दिली आहे. याला अनुसरून मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी कर्जमाफीसाठी विरोधकांनी आठवडाभर वाट पाहावी, असा सल्ला दिला आहे.

प्रदेश भाजपने सोमवार दि. 28 रोजी कर्नाटक बंदची हाक दिली असली तरी हा बंद स्वयंघोषित असेल, असे सांगितले आहे. यामध्ये शेतकर्‍यांसह राज्यातील जनतेने भाग घ्यावा, असे आवाहन पक्षाचे राज्य मुख्य सचिव एन. रवीकुमार यांनी केले. 

रविवारी ते पत्रकारांशी बोलत होते. रवीकुमार पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुकीवेळी निजदच्या जाहीरनाम्यात सत्ता मिळाल्यानंतर चोवीस तासांत शेतकर्‍यांची कर्जमाफी करण्याचे आश्‍वासन दिले होते. सरकार सत्तेवर येऊन दोन दिवसानंतरही कर्जमाफीच्या कोणत्याच हालचाली नाहीत. मुख्यमंत्रिपदी शपथ घेतलेल्या दिवशीच त्यांनी कर्जमाफीविषयी घूमजाव केले होते. निजदने स्वबळावर सत्ता स्थापन केल्यास कर्जमाफी करण्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. हे चुकीचे आहे. कुमारस्वामी यांच्याकडून विश्‍वासघाताची ही पहिलीच वेळ नाही. याआधीच्या निजद-भाजप युती सरकारवेळी त्यांनी भाजपला सत्तेचे हस्तांतरण केले नव्हते. विश्‍वासघात केला होता. दरम्यान, सध्या मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. त्यामुळे आठवडाभरात कर्जमाफीवर निर्णय घेण्यात येईल. कर्जमाफी करता आली नाही तर पदाचा राजीनामा द्यावा, असे सांगण्याचा अधिकार कुणालाच नाही. दरम्यान, विरोधी पक्षनेते बी. एस. येडियुरप्पा यांनी पुकारलेल्या कर्नाटक बंदमुळे समाजात फूट पाडण्याचे काम होत असल्याची टीका कुमारस्वामींनी केली. त्याआधी त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या 54 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भाग घेतला.