Mon, Jun 17, 2019 10:40होमपेज › Belgaon › प्रबोधन खूप झाले, कृतीचे काय?

प्रबोधन खूप झाले, कृतीचे काय?

Published On: Dec 21 2017 1:54AM | Last Updated: Dec 20 2017 10:26PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

केवळ पंधरा दिवसाच्या कालावधीत परिवर्तनवादी विचाराचा जागर करणारे दोन महत्त्वपूर्ण कार्यक्रम शहरात पार पडले. त्याला चांगला प्रतिसाद लाभला. यामुळे पुन्हा एकदा पुरोगामी विचारांना झळाळी मिळाली असून कार्यकर्त्यांमध्ये बळ संचारले आहे. परंतु, प्रबोधन खूप झाले, प्रत्यक्ष कृतीचे काय, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

प्रबोधनामुळे कार्यकर्त्यांमध्ये वैचारिक जागर झाला आहे. यामध्ये  सातत्य राखण्याचे आव्हान चळवळीत सक्रिय असणार्‍या नेत्यांना अधिक जबाबदारीने पेलावे लागणार आहे. बेळगाव परिसरात एकेकाळी पुरोगामी विचारांची चळवळ गतिमान होती.  यामुळे समाजातील अनेकांनी रुढी, परंपराच्या बेड्या झुगारून पुरोगामी विचाराचा अवलंब केला होता. विशेष करून महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा पगडा अधिक होता. 

मात्र मध्यंतरीच्या काळात पुरोगामी चळवळ सुस्त झाली. यामुळे बहुजन समाज रुढी-परंपरांच्या जोखडाखाली सापडला. यातून लाखो रुपये खर्चून यात्रा-जत्रा साजरा करणे, लग्नकार्यात पैशांचा वारेमाप वापर करण्याचे प्रस्थ वाढले. यातून प्रबोधनाचे काम करणार्‍या परिवर्तनवादी कार्यकर्त्यांवर मर्यादा आल्या आहेत. परिणामी उजव्या संघटनांनी उचल खाली आहे. यातूनच काही ठरावीक भागात दंगलीचे लोण सतत पसरत आहे. 

एकेकाळी सीमाभागातील बहुजन समाजाची मानसिक जडणघडण करणार्‍या शेकापचे अस्तित्व म. ए. समितीच्या राजकारणात अडकले आहे. नव्या कार्यकर्त्यांचे प्रबोधन बंद झाले आहे.   

कॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन आणि महात्मा जोतिराव फुले व्याख्यानमालेने कार्यकर्त्यांना चार्ज करण्याचे काम केले आहे. विचारावर साचलेली राख उडवली आहे. याचा वापर परिवर्तनवादी चळवळ पुन्हा एकदा गतिमान करण्यासाठी होणे आवश्यक आहे. उपरोक्त आव्हान भावी काळात या चळवळीत कार्यरत असणार्‍यांना जबाबदारीने पेलावे लागणार आहे.