Sun, May 26, 2019 19:16होमपेज › Belgaon › गुंडांबरोबर निष्पापांचीही ओळख परेड!

गुंडांबरोबर निष्पापांचीही ओळख परेड!

Published On: Sep 08 2018 1:31AM | Last Updated: Sep 07 2018 8:33PMबेळगाव : प्रतिनिधी

गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस खात्याकडून आतापासूनच तयारी सुरु करण्यात आली आहे. 11 दिवस चालणार्‍या गणेशोत्सवात कोणतेच विघ्न न येता उत्सव सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पोलिस खात्याने कंबर कसली आहे. गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींची परेड घेण्यात येत आहे. निरपराध युवकांनाही परेडसाठी पोलिसांकडून सूचना करण्यात येत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येते. 

शहर पोलिस स्थानकांच्या व्याप्तीसह ग्रामीण स्थानकांच्या व्याप्तीत येणार्‍या युवकांना परेडसाठी हजर राहण्याची सूचना करण्यात येत आहे. गणेशोत्सवात कसलेच विघ्न येऊ नये यासाठी पोलिस खात्याकडून शहरातील संवेदनशील, अतिसंवेदनशीलसह गर्दीच्या भागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम जोरात सुरु आहे. रात्रीसुद्धा ये-जा करणार्‍यांची छबी टिपणे सोयीचे व्हावे यासाठी उत्कृष्ट दर्जाच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची व्यवस्था करण्यात येत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. शहर परिसरात जवळपास 300 पेक्षा अधिक कॅमेरे बसविण्याची योजना अखण्यात आली आहे. 

याबरोबरच गुंड प्रवृत्तीच्या युवकांची यादीही तयार करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित युवकांना पोलिसांकडून आतापासूनच सूचना करण्यात येत आहे. अनेक जणांना स्थानकात बोलावून हजेरी देण्याची सूचना करण्यात येत आहे. पोलिसांच्या यादीत असणार्‍या गुंड व्यक्तींसह नव्याने यामध्ये युवकांचाही समावेश करण्यात आला आहे. 

शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. यामुळे पोलिस आयुक्त डी. सी. राजाप्पा यांनी आपल्या कार्यक्षेत्राच्या व्याप्तीत येणार्‍या स्थानकांना भेट देऊन आवश्यक सूचना करण्यावर भर दिला आहे. पोलिस कर्मचार्‍यांच्याही समस्या जाणून महत्त्वाच्या सूचना करण्यात येत आहेत. उत्सव काळात चोख बंदोबस्त ठेवण्यावर खात्याकडून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.