होमपेज › Belgaon › देशी गायी पालनातून शेतकर्‍यांसमोर आदर्श

देशी गायी पालनातून शेतकर्‍यांसमोर आदर्श

Published On: Jun 25 2018 1:46AM | Last Updated: Jun 24 2018 9:10PMअकोळ : महालिंग पाटील

भारतीय संस्कृतीत गायीला महत्त्व असून गाय पालन शुभ मानले जाते. देशी गायींपासून मानवी आरोग्याला हिताचे ठरते. खेड्यात देशी गायींचे पालन केले जाते.  देशी गायी पालनातून अनेक फायदे आहेत. अकोळ येथील प्रवीणभाई शाह यांनी 26 देशी व गीर गायींचे संगोपन करुन  शेतकर्‍यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

काळी कपिला गाय सर्वश्रेष्ठ आहे. हरियानात या गायीला सेहवाल म्हणतात. महाराष्ट्रात खिलार, गुजरातमध्ये गीर, मध्यप्रदेशात थारवरकर म्हणून ओळखले जाते. घरात सुख-शांतीसाठी व आरोग्याला ऊर्जा मिळण्यासाठी गायींचे संगोपन आजही केले जाते. अकोळमधील प्रवीणभाई शाह यांच्या गायींच्या गोठ्याला समधीमठ, आडी, कणेरी मठाच्या स्वामीनी भेट देऊन कौतूक केले आहे.

देशी गायींच्या संगोपनाबाबत प्रवीणभाई शाह म्हणाले, आपण सुरुवातीला गौरी आणि लक्ष्मी अशा दोन गायी आणल्या. यड्रावहून गीर गाय आणली. सध्या 19 गायी व 7 वासरे असून त्यांच्या देखभालीसाठी गुजरातमधील एक व्यक्‍ती आहे. देशी गायीच्या दुधामुळे आरोग्याच्या तक्रारी येत नाहीत. गोमूत्रही गुणकारी आहे.

शेतामध्ये गायीच्या शेणखताचा वापर करण्यात येत आहे. पिकांना आजतागायत रासायनिक खत वापरले नाही. कडबा कुटी, पशुखाद्य याठिकाणीच तयार केले जाते. सर्व पालेभाज्या, फळे, फुलझाडे सेंद्रिय खतावर आहेत. देशी गायी पालनातून जीवनात सुख मिळत असून आरोग्यदायी जीवन जगण्यास लाभ होत असल्याचेही प्रवीणभाई शाह यांनी सांगितले.